मोहम्मद शमीने २२ धावांत घेतलेले ४ बळी, जसप्रीत बूमराहची ३२ धावांतील ३ बळींची कामगिरी या जोरावर भारताने वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडवर १०० धावांनी मात केली. भारताचा हा सलग सहावा विजय ठरला.
भारताच्या खात्यात आता १२ गुण असून बाद फेरीतील भारताचा प्रवेश आता जवळपास निश्चित झाला आहे. दक्षिण आफ्रिका आता दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्या खात्यात १० गुण आहेत. न्यूझीलंड ८ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यातही ८ गुण आहेत.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्यांचा हा निर्णय यशस्वी होताना दिसला. रोहित शर्माची ८७ धावांची खेळी आणि सूर्यकुमार यादव (४९) आणि केएल. राहुलच्या ३९ धावा या जोरावर भारताने कशीबशी २२९ धावसंख्येपर्यंत मजल मारली. भारताचे पहिले तीन फलंदाज शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे ४० धावांतच माघारी परतल्यामुळे भारत संकटात सापडला होता पण रोहित शर्माने एका टोकाने किल्ला लढविला. राहुल बाद झाला तेव्हा भारताने शतक पूर्ण केले होते. मात्र ठराविक अंतराने भारतीय फलंदाज बाद होत गेले. भारताने २०० धावांचा टप्पा ओलांडला तेव्हा ८ फलंदाज माघारी परतले होते. त्यामुळे ही धावसंख्या इंग्लंडला पार करणे सहज शक्य आहे असे दिसत होते.
इंग्लंडच्या डेव्हिड विलीने ४५ धावांत ३, तर वोक्स व रशिदने प्रत्येकी २ बळी घेतले.
पण भारताची ही धावसंख्या पार करता करता इंग्लंडची चांगलीच दमछाक झाली. एकाही इंग्लिश फलंदाजाला ३० पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. किंबहुना त्यांचा अर्धा संघ ५२ धावांतच माघारी परतला. त्यामुळे पराभव निश्चित होणार हे स्पष्ट झाले. शंभर धावा पूर्ण करण्याच्या आत त्यांचे ८ फलंदाज तंबूत परतले आणि इंग्लंडचा पराभव पक्का झाला. तरीही शेवटी डेव्हिड विली, आदिल रशिद यांनी विजयाची प्रतीक्षा लांबविली. अखेर इंग्लंडचा डाव १२९ धावांतच आटोपला.
हे ही वाचा:
चक्क काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल अदानींच्या फायद्यासाठी काम करतात!
टीएमसी मंत्र्याच्या मुलीने शिकवणीतून कमावले ३ कोटींची रक्कम
मुंबईची काळी-पिवळी ‘पद्मिनी प्रिमियर टॅक्सी’ आता इतिहासात जमा!
उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूची लागण!
शमी आणि बूमराहने मिळून इंग्लंडच्या ७ फलंदाजांना माघारी धाडले. सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला रोहित शर्मा. त्याने १० चौकार आणि ३ षटकारांसह ८७ धावांची चिवट खेळी केली.
विराट प्रथमच शून्यावर बाद
विराट कोहलीला ४९ वे विक्रमी वनडे शतक झळकाविण्याची संधी या सामन्यात मात्र मिळाली नाही. तो शून्यावरच बाद झाला. त्याच्या वर्ल्डकप क्रिकेट प्रवासामध्ये शून्यावर बाद होण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती.