ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये पहिला सामना भारताने जिंकला आहे. मोहाली येथे झालेला हा सामना भारताने पाच विकेटने जिंकल्यामुळे भारताला ११६ गुण मिळाले. त्यामुळे ११५ गुणांनिशी पहिल्या क्रमांकावर असलेल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला त्यांनी मागे टाकून एकदिवसीय संघांमध्ये पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलिया संघाने तिसरे स्थान कायम ठेवले आहे.
मोहम्मद शामीने घेतलेल्या पाच विकेट हे या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. कर्णधार के. एल. राहुल याने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनीही अर्धशतके ठोकून १४२ धावांची धमाकेदार सुरुवात केली. त्यानंतर सुरुवातीला काही विकेट गमावल्यानंतरही के. एल. राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी किल्ला लढवत भारताला विजयपथावर नेले.
नुकत्याच झालेल्या आशिया कप आणि ऑस्ट्रेलियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेली मालिका यामुळे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांच्या नजरा पहिल्या क्रमांकावर लागल्या होत्या. भारताला पहिले स्थान मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-१ने जिंकणे क्रमप्राप्त आहे. तर, आशिया कपमध्ये पाकिस्तानचा संघ श्रीलंकेविरुद्ध पराभूत झाल्याने त्यांना फटका बसला.
ऑस्ट्रेलियाचा संघ पराभूत झाल्याने विश्वचषकाआधी तरी हा संघ पहिल्या क्रमांक पटकावू शकत नाही. तर, ऑस्ट्रेलियाने उर्वरित दोन सामने जिंकल्यास पाकिस्तान पुन्हा पहिल्या क्रमांकावर झेप घेऊ शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकल्यामुळे भारत आता क्रिकेटच्या सर्व प्रकारांत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
हे ही वाचा:
स्लीप मोडवर असलेल्या प्रज्ञान, विक्रमशी संपर्क करण्याचा इस्रोचा प्रयत्न
नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस; शाळांना सुट्टी
अजित पवारांकडून शरद पवारांच्या आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची मागणी
महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी अदानींना मिळाले १३,८८८ कोटी रुपयांचे कंत्राट !
भारताचा संघ याआधीच कसोटी आणि टी २० क्रिकेट प्रकारामध्ये अव्वल स्थानी आहे. आतापर्यंतच्या इतिहासात क्रिकेटच्या सर्व प्रकारांत अव्वल स्थान मिळवण्याची कामगिरी करणारा भारत हा दुसरा देश ठरला आहे. याआधी ऑगस्ट २०१२मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ही कामगिरी केली होती.