अंतराळातील राडारोडा हटवण्याच्या जागतिक प्रयत्नांमध्ये सामील होण्याचा भारताचा इरादा स्पष्ट करत इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सन २०३०पर्यंत राडारोडामुक्त अंतराळ मोहिमा साध्य करण्याचे देशाचे उद्दिष्ट असल्याचे मंगळवारी जाहीर केले. बेंगळुरूमधील ४२व्या इंटर-एजन्सी स्पेस डेब्रिस कोऑर्डिनेशन कमिटी (आयएडीसी) ला संबोधित करताना ते बोलत होते. ‘इस्रोकडे अंतराळ संशोधनासाठी स्पष्टपणे मांडलेली योजना आहे.
अंतराळाची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी राडारोडामुक्त अंतराळ मोहिमा आयोजित केल्या जाव्यात, यासाठी भारत पुढाकार घेणार आहे. मी आज या उपक्रमाची घोषणा करू इच्छितो. या उपक्रमाचे उद्दिष्ट २०३०पर्यंत सर्व भारतीय अंतराळ मोहिमा मग त्या सरकारी असो वा गैर-सरकारी, त्या राडारोडामुक्त असाव्यात, हे उद्दिष्ट साध्य करायचे आहे. बाह्य अवकाशाच्या दीर्घकालीन शाश्वततेसाठी भारताचा या उपक्रमाला नेहमीच पाठिंबा असेल,’ असे इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ म्हणाले.
हे ही वाचा:
रामनवमी: रावणाच्या अत्याचारातून मुक्तीसाठी भगवान विष्णूंचा सातवा अवतार
ग्लेन मॅक्सवेलने घेतला आयपीएलमधून ब्रेक
‘स्वतः आंबेडकरही भारताचे संविधान बदलू शकत नाहीत’!
मुंबईत झाडांवरील रोषणाईच्या माळा काढण्यास सुरुवात!
अंतराळातील भारतीय उपग्रहांच्या संख्येबद्दलही सोमनाथ यांनी लक्ष वेधले. ‘सध्या अंतराळात भारताची ५४ अंतराळयाने तसेच कार्यक्षम नसलेल्या वस्तू आहेत. जिथे शक्य आहे तिथे अंतराळातील वस्तूंची विल्हेवाट लावणे किंवा त्यांच्या सक्रिय भूमिकेतून काढून टाकण्याचे काम आम्ही अत्यंत सावधगिरीने करत आहोत आणि एकदा त्यांचे काम करणे संपले की त्यांना सुरक्षित ठिकाणी आणणे हा एक महत्त्वाचा विषय आहे, ज्यावर आम्ही सर्व काम करत आहोत,’ अशी माहिती त्यांनी दिली. इस्रोने या मोहिमेचा भाग म्हणून आणि कोणताही अपघाताचा धोका कमी करण्यासाठी डीऑर्बिटिंग प्रक्रियेद्वारे अनेक जुने उपग्रह आणि पीएसएलव्ही रॉकेटचा काही भाग पृथ्वीवर परत आणला होता.
भविष्यात प्रक्षेपित होणाऱ्या सर्व अंतराळयानांचे भाग सुरक्षित ठिकाणी आणणे सुनिश्चित करण्यासाठी कारवाई केली जाईल. प्रक्षेपित केलेल्या प्रणालींमध्ये, रॉकेट किंवा अंतराळ यानाच्या वरच्या टप्प्यांसह, आम्ही एक विशिष्ट यंत्रणा तयार केली आहे. त्याचे डिझाइन आम्ही काळजीपूर्वक केले असून त्यामुळे अतिरिक्त राडारोडा निर्माण होणार नाही,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सन २०३५पर्यंत स्वतःचे अंतराळ स्थानक ‘भारतीय अंतरिक्ष स्टेशन’ उभारण्याचा भारताचा मनोदयही जाहीर केला. अंतराळात मानवी उपस्थितीसाठी हे क्षेत्र संरक्षित केले पाहिजे. आम्ही सर्व अंतराळ स्थानके आणि त्याच्या संबंधित अन्य खासगी कंपन्यांनी केलेल्या कराराकडे लक्ष ठेवून आहोत. अंतराळ हे शाश्वत राहिले पाहिजे, त्यात अधिकाधिक राडारोडा तयार होऊ नये, जेणेकरून मानव अधिकाधिक अवकाशमोहिमा सुरू ठेवू शकतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.