मेरे प्यारे परिवारजन… म्हणत पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासाचा लेखाजोगा मांडला

लाल किल्यावर ध्वजारोहण पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केले

मेरे प्यारे परिवारजन… म्हणत पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासाचा लेखाजोगा मांडला

देशभरात स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहाचे वातावरण असून सर्वत्र ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिरंगा फडकावण्यात आला. गेला. नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांच्या वतीने तिरंग्याला सलामी दिली. लाल किल्यावर ध्वजारोहण पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

मेरे प्यारे परिवारजन… असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करत अनेक मुद्द्यांना हात घातला.

भारत युवांचा देश!

आपण जे काही निर्णय घेऊ, ते हजार वर्षे आपली दिशा ठरवणार आहेत. देशाच्या सुपुत्रांना सांगू इच्छितो की, आज जे भाग्य लाभले आहे, ते क्वचितच कोणाच्या नशिबी आले आहे. युवाशक्तीवर विश्वास आहे. भारताची ही ताकद पाहून जग आश्चर्यचकित होत आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताने जे आज कमावलं आहे ते केवळ दिल्ली, मुंबई, चेन्नईपुरते मर्यादित नाही. छोट्या शहरातील तरुणही नाव कमवत आहेत. देशाची क्षमता दिसून येते. जगात ३० वर्षांपेक्षा कमी वयाची सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे. आज घेतलेल्या निर्णयाने भविष्य निश्चित होईल, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

देश मणिपूरच्या पाठीशी

देश मणिपूरच्या लोकांच्या पाठीशी उभा आहे. शांततेतूनच मार्ग शोधला जाऊ शकतो. केंद्र आणि राज्य सरकार यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. देश मणिपूरच्या लोकांसोबत आहे, आता शांततेच्या बातम्या येत आहेत, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिला.

जागतिक व्यवस्थेचा निर्णय घेण्याची भारताकडे संधी

भारताची ताकद आणि आत्मविश्वास नवीन उंचीवर जात आहे. भारताला जी- २० शिखर परिषदेचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. यानिमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या शक्तीचा परिचय जगासमोर झाला. भारताची निर्यात झपाट्याने वाढली आहे. करोनाच्या काळानंतर जगाने नव्याने विचार करायला सुरुवात केली आहे. कोरोनानंतरची जागतिक व्यवस्था, नवीन राजकीय समीकरण पुढे सरकत आहे, हे मी आत्मविश्वासाने पाहत आहे. यातून देश बदलत आहेत. बदलत्या जगाला आकार देण्यासाठी १४० कोटी भारतीयांची क्षमता दिसून येत आहे. जागतिक व्यवस्थेचा निर्णय घेण्यासाठी आज चेंडू आपल्या कोर्टात आहे. ही संधी सोडता कामा नये.

विश्वकर्मा योजनेची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजना लागू होणार. अनेक योजनांचा लोकांना फायदा झाला आहे. पारंपारिक कौशल्य असलेल्यांसाठी पुढील महिन्यात सरकार १३ हजार ते १५ हजार कोटी रुपयांच्या वाटपासह विश्वकर्मा योजना सुरू होणार, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी भाषणात केली.

भ्रष्टाचाराच्या राक्षसाच्या तावडीत होता देश

२०१४ आपण सत्तेत आलो तेव्हा जागतिक आर्थिक व्यवस्थेत देश १० व्या क्रमांकावर होता. आज १४० कोटी भारतीयांच्या प्रयत्नाने आपण पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. भ्रष्टाचाराच्या राक्षसाच्या तावडीत देश होता. पण, आम्ही गळती थांबवली आणि एक मजबूत अर्थव्यवस्था निर्माण केली.

हे ही वाचा:

देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान, त्यांच्या सक्षमीकरणाची गरज

मोदींच्या आवाहनानंतर भाजप नेत्यांनी बदलला डीपी, पण गमावले गोल्डन टिक

महाराष्ट्रातल्या ३३ पोलिसांना पोलीस शौर्य तर ४० पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक

काश्मीरमध्ये ‘हिजबुल’ दहशतवाद्याच्या भावानेच फडकवला तिरंगा

महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार

करोनामुळे नवीन संकटे निर्माण झाली असून जग महागाईच्या संकटाला तोंड देत आहे. भारताने महागाई नियंत्रणासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. यशही मिळाले आहे. मात्र, जगापेक्षा चांगली परिस्थिती आपली आहे, असा विचार करून आपण बसू शकत नाही. देशाला महागाईपासून मुक्त करणे हे ध्येय आहे. यासाठी प्रयत्न सुरू राहणार आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Exit mobile version