आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ दवाखान्यांच्या उद्घाटनासाठी एकनाथ शिंदे हे धारावीला जाणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री धारावी पुर्नविकास प्रकल्पाबाबत मोठी घोषणा करणार असल्याची माहिती आहे.
सर्वसामान्य नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी महापालिका क्षेत्रात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने उभारण्यात येत आहेत. धारावीत उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे लोकार्पण गुरूवारी दुपारी ४ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तानाजी सावंत, दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, राहुल शेवाळे यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या दवाखान्यांमध्ये वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी मोफत केली जाणार आहे. तसेच १४७ प्रकारच्या रक्तचाचण्या देखील मोफत करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त एक्स रे, सोनोग्राफी यासारख्या चाचण्यांकरीता पॅनलवर असणाऱ्या वैद्यकीय चाचणी केंद्रांमधून करण्यात येणार आहेत.
हे ही वाचा :
कीर्तीकर शिंदे गटात गेल्यामुळे संजय निरुपमना संताप
श्रद्धाच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिस करणार आफताबची नार्को टेस्ट
वाराणसीच्या धर्तीवर गोदावरीवर होणार महाआरती
यावेळी धारावी पुर्नविकास प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री घोषणा करू शकतात अशी माहिती आहे. धारावी पुर्नविकास प्रकल्पासाठी मागवलेल्या निवेदा प्रक्रियेत तीन विकासकांनी सहभाग घेतला आहे. यासाठी अदाणी ग्रुप, नमन ग्रुप आणि डीएलफ कंपनी अशी या विकासकांची नावे आहे. जवळपास ६०० एकरांवर लाखो नागरिकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. हा प्रकल्प जवळपास २३ हजार कोटी रुपयांचा असणार आहे.