गोव्याला नमवून महाराष्ट्राच्या किशोर खोखो संघाची विजयी सलामी

गोव्याला नमवून महाराष्ट्राच्या किशोर खोखो संघाची विजयी सलामी

३१ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे आयोजन २७ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर २०२१ या कालावधीत इंदिरा स्टेडीयम, नांगल रोड, उना, हिमाचल प्रदेश येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत आज महाराष्ट्राच्या किशोर संघाने गोव्यावर दणदणीत विजय मिळवत शानदार विजयी सलामी दिली.

आज सकाळच्या सत्रात पार पडलेल्या या सामन्यात महाराष्ट्राच्या किशोर संघाने गोव्यावर दणदणीत विजय मिळवताना ३१-०६ असा एक डाव २५ गुणांनी धुव्वा उडवला. महाराष्ट्र संघाचा आज एकही गडी प्रत्यक्ष बाद करण्यात गोव्याच्या खेळाडूंना यश आले नाही. महाराष्ट्राचे प्रशिक्षक प्रफुल्ल हाटवटे यांनी आपल्या खेळाडूंची दमछाक न होऊ देता सर्व संरक्षकांना ठराविक अंतराने निवृत्त व्हायला लावले. त्यामुळे गोव्याला दोन्ही डावात जे ६ गुण मिळाले आहेत ते निवृत्त झालेल्या संरक्षकांचे आहेत. महाराष्ट्राच्या पहिल्या डावात राज जाधव, व अथर्व पाटील, तर दुसर्‍या डावात ईशांत वाघ, मोहन चव्हाण, यांनी निवृत्त होत गुण बहाल केले. महाराष्ट्राने आक्रमणात हाराद्या वसावेने ६ गडी तर कर्णधार सोत्या वळवी व जिशान मुलाणीने प्रत्यकी ५-५गडी बाद करत मोठा विजय साजरा केला. तर गोव्याच्या देवांश व रजतने थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला.

किशोरांच्या दुसर्‍या सामन्यात कोल्हापूरने हिमाचल प्रदेशचा २१-५ असा एक डाव १६ गुणांनी पराभव केला. कोल्हापूरच्या योगेशने ५ मिनिटे संरक्षण केले, उदयने ३.२० मि. संरक्षण केले तर श्रवणने नाबाद २ मि. संरक्षण करत विजयात मोलाचा वाटा उचलला. कर्नाटकच्या किशोरांनी बिहारचा २९-४ असा एक डाव २५ गुणांनी पराभव केला. या सामन्यात कर्नाटकच्या प्रीथमने ६ मि. प्रकाशने ३.१० मि. व गुरुराजने ३ मि. संरक्षण केले.

हे ही वाचा:

विकासकामांना पाठिंबा दिल्याबद्दल सरपंचाच्या पतीची केली माओवाद्यांनी हत्या

तीन पक्षांचा तमाशा!

‘आजचा दिवस बेईमान दिवस म्हणून साजरा करायला हवा’

‘महाविकास आघाडी नव्हे महाविश्वासघातकी आघाडी’

 

किशोरांच्या सामन्यांमध्ये विदर्भाने केरळचा १३-१० असा ६ मि. राखून २ गुणांनी पराभव केला. छत्तीसगडने पंजाबचा ११-१० असा ३.४० मि. राखून १ गुणाने पराभव केला. चंदीगडने त्रिपुरावर ११-०२ असा एक डाव ९ गुणांनी विजय संपादन केला. हरयाणाने मध्य प्रदेशचा ३३-३ असा एक डाव ३० गुणांनी धुव्वा उडवला तर तेलंगणाने जम्मू कश्मीरवर २१-५ असा एक डाव १६ गुणांनी विजय मिळवला.

किशोरींच्या सामन्यांमध्ये तेलंगणाने मध्य भारतचा १३-२ असा एक डाव ११ गुणांनी पराभव केला, उत्तर प्रदेशने हिमाचल प्रदेशचा १०-४ असा एक डाव ६ गुणांनी पराभव केला तर विदर्भाने उत्तराखंडवर १७-१२ असा ५ गुणांनी पराभव केला. तर कोल्हापूरने त्रिपुरावर २६-० असा एक डाव २६ गुणांनी दणदणीत विजय साजरा केला.

Exit mobile version