मध्यप्रदेशात एका चहाविक्रेत्याने अनोखा सोहळा साजरा केला आहे. या चहा विक्रेत्याने मध्य प्रदेशात काढलेली मिरवणूक सध्या चांगलीच चर्चेत आहे. या चहाविक्रेत्याने ही मिरवणूक काढून आपल्या पाच वर्षांच्या मुलीसाठी स्मार्टफोन खरेदी केल्याचा आगळा वेगळा आनंद साजरा केला आहे.
नवीन फोन घेतल्याच्या आनंदात चहावाल्याने फटाके फोडले एवढेच नव्हे तर, त्याने डीजे, ढोल ताशा आणले होते. लोक हे बघून आश्चर्यचकित झाले. तर काही लोक डीजेच्या तालावर नाचले. त्याची लाडकी मुलगी सजवलेल्या घोडागाडीवर मोबाईल घेऊन बसली होती. त्याने १२ हजार ५०० रुपयांना मोबाईल विकत घेतला. हा त्याच्या कुटुंबाचा पहिला स्मार्टफोन असल्यामुळे धुमधडाक्यात सोहळा केल्याचे त्याने सांगितले.
या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या क्लिपमध्ये, मुलगी आणि तिची भावंडं दिव्यांनी सजलेल्या घोडागाडीवर बसलेली आहेत. आणि लाऊडस्पीकरवर गाणं वाजत आहे आणि लोक मिरवणुकीत नाचताना दिसताहेत.
चहा विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मुरारी कुशवाहा यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले की, मोबाईल खरेदी केल्यानंतर, शिवपुरी शहरातील जुन्या भागात असलेल्या मोबाईल फोनच्या दुकानातून त्यांच्या घरापर्यंत ढोल ताशांच्या गजरात, घोडागाडीसह फटाके फोडून मिरवणूक काढण्यात आली. नंतर त्याने आपल्या मित्रांना घरी पार्टी देखील दिली.
हे ही वाचा:
उद्या कोणी वाकडे तोंड करून बोलले तर?…चालेल का?
१७० बहुमत असतानाही महाविकास आघाडीच्या मानगुटीवर भीतीचे भूत
इम्पेरिकल डेटासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर
‘जनता खड्ड्यांमधून मार्ग काढतेय; पण राजासाठीचे रस्ते चकचकीत’
त्यांनी सांगितले की, त्यांची पाच वर्षांची मुलगी खूप दिवसांपासून मोबाईल फोन घेण्यासाठी हट्ट करत होती. त्याने मुलीला वचन दिले होते की, जेव्हा तो फोन विकत घेईल तेव्हा संपूर्ण शहरात तो मोबाईल घेतल्याचा आनंद साजरा करेन. आणि त्याने त्याचे वचन पाळलेले दिसत आहे. त्याच्याकडे आवश्यक रक्कमेपेक्षा रक्कम कमी होती. म्हणून त्याने दुकानदाराच्या परवानगीने मोबाईल फोन कर्जावर खरेदी केला आहे.