शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली
सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते विनय आपटे यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली म्हणून सईशा फाऊंडेशन मुंबई निर्मित व प्रस्तुत ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ४२ नवगीतांमधून साकारलेला ऐतिहासिक सांगीतिक कार्यक्रम होणार आहे. सोबत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’विषयीचे मनोगत सुद्धा चलचित्राच्या सहाय्याने दाखविले जाणार आहे. ७ डिसेंबर रोजी लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले पूर्व येथे सायंकाळी ६ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
विनय आपटे यांच्या आवाजाने कायमच अनेकांना मोहिनी घातली. या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे आणि श्रेष्ठ कलाकाराचे शिवचरित्राबद्दल असलेले नितांत प्रेम, श्रद्धा ही आपणा सर्वांनाच सर्वश्रुत आहे. आणि म्हणूनच त्यांनी याच भारदस्त आवाजात ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ या कार्यक्रमातील शिवगीतांसाठी आपल्या आवाजाच्या विशेष शैलीत जणू “छत्रपती शिवाजी महाराजच” आपले मनोगत सांगत आहेत अशा पद्धतीनेच याचे निवेदन केलेले आहे. याच भारदस्त आवाजातील ध्वनिफितींसह हा विशेष कार्यक्रम होणार आहे.
राष्ट्रनिर्मितीच्या उद्देशाने केलेल्या या खास ध्वनिफितींमध्ये शिवचरित्राचा महान संदेश तर दडलेला आहेच, पण त्याही सोबत धगधगत्या नवगीतांच्या सादरीकरणातून व भालजी पेंढारकर प्रतिष्ठानच्या सहकार्याने भालजींच्या चित्रपटांच्या अखंड चलचित्रांच्या सहाय्याने ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ हा विशेष कार्यक्रम समस्त शिवभक्तांना व श्रोत्यांना साडे तीनशे वर्षे इतिहासात घेऊन जाईल यात कोणतीही शंका नाही.
अनिल नलावडे यांच्या संकल्पनेतून व लेखणीतून साकार झालेल्या, विनय आपटे यांच्या भारदस्त आवाजातील निवेदनातून बहरलेल्या व पद्मश्री राव यांच्या दिग्दर्शनातून साकार झालेल्या ४२ नवगीतांच्या या धगधगत्या संगीतमय शिवचरित्राला म्हणजेच ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ या उपक्रमाला आपण सर्वांनीच उपस्थित रहावे हे नम्र आवाहन. सदरहू उपक्रम सर्वतः विनामूल्य आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्र अलर्टवर! ओमिक्रोन मुंबईच्या उंबरठ्यावर?
पाकिस्तानी नोकरशाहीचे इम्रानविरुद्ध ‘बंड’
उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला मागे टाकत गुजरातची मुसंडी
अखेर विराटने जिंकली नाणेफेक! पहिल्या दिवशी फक्त ७८ षटकांचा खेळ
गायक केतन पटवर्धन, दत्तात्रय मेस्त्री, दीप्ती आंबेकर व स्वतः अनिल नलावडे ही नवगीते सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन, सूत्रसंचालन पद्मश्री राव करणार आहेत. विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठानचे कार्य, भविष्यात होणारे कार्यक्रम व श्री. विनय आपटे सरांच्या स्मृतींना आदरांजली वाहून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.