दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात नेहमीच विविध मुद्द्यांवरून वादंग निर्माण होत असतात. त्यात डाव्या मंडळींकडून कायम उच्छाद केला जात असतो. आता शिवजयंतीनिमित्त डावे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी यांच्यात संघर्ष झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा खाली फेकून त्या तस्बिरीला घातलेले हारही खाली फेकून देण्यात आले. तसे फोटोही अभाविपतर्फे शेअर करण्यात आले.
अभाविपने हे फोटो शेअर करताना म्हटले आहे की, जेएनयूमध्ये डाव्या मंडळींतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची तस्बीर खाली पाडण्यात आली आणि तिथे तोडफोड करण्यात आली. अभाविप या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करते.
हे ही वाचा:
आशीष शेलार संतापले; फेकलेल्या तुकड्यावर त्यांचे घर चालते
भात्यातून बाण निसटले आता ब्लू टिक मोडले
मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाय चाटले
शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप
यावर डाव्या गटाच्या विद्यार्थ्यांनी दावा केला की, अभाविपच्या कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी आमच्यावर हल्ला केला. आम्ही दर्शन सोलंकी या विद्यार्थ्याच्या मृत्यूसंदर्भात त्याच्या वडिलांनी सांगितल्यामुळे कँडल मार्च काढला होता. आयआयटी बॉम्बेमधील दर्शन सोलंकी याला मारहाण करण्यात आल्याचे प्रकरण होते. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर जेएनयूमध्ये कँडल मार्च काढण्यात आला होता पण अभाविपने त्याला विरोध केला.
अभाविपने म्हटले आहे की, डाव्यांच्या विद्यार्थी संघटनेने शिवाजी महाराजांच्या फोटोला घातलेला हार काढून टाकला आणि तो फोटो खाली फेकला.
दोन्ही बाजूंनी आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. यानंतर दिल्ली पोलिसांनी जेएनयूला वेढा घातला असून अनेक प्रमुख अधिकारी तिथे दाखल झाले आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही दिवसांपूर्वी बीबीसी डॉक्युमेंट्रीवरून तिथे वादंग निर्माण झाला होता. डाव्या संघटना तिथे या डॉक्युमेंट्रीचे प्रदर्शन करू इच्छित होत्या पण अभाविपने त्याला विरोध केला होता. काही विद्यार्थ्यांनी ही डॉक्युमेंट्री पाहिलीही. पण तिथली वीज त्यानंतर कापण्यात आली. तेव्हाही पोलिसांनी हस्तक्षेप केला होता.