गुजरातच्या तुरुंगात कैद्यांना आणि हिऱ्यांना पाडले जातात पैलू!

दर महिन्याला जवळपास २५ हजार हिरे घडवले जातात

गुजरातच्या तुरुंगात कैद्यांना आणि हिऱ्यांना पाडले जातात पैलू!

तुरुंग म्हटला की आपल्या डोळ्यांसमोर येते ते तुरुंगाची दगडी मजबूत भिंत, त्यात काळे-पांढरे पट्टेरी कपडे परिधान केलेले कैदी आणि चित्रपटात दाखवितात त्याप्रमाणे हाणामारीची दृश्येही डोळ्यांसमोर तरळून जातात. मात्र काही तुरुंग याला अपवाद ठरू लागली आहेत.

 

 

 

तुरुंग हा गुन्हेगाराला केवळ शिक्षा देणारा नव्हे तर या कैद्यांच्या जीवनाला नवी दिशा देणारा दिशादर्शकही ठरला आहे. गुजरातच्या तुरुंगातील कैदी दर महिन्याला जवळपास २५ हजार हिऱ्यांना पैलू पडतात. या हिऱ्यांना पैलू पाडून हिरे चमकवण्यासह स्वत:चे भविष्यही प्रकाशमय करण्याचे ध्येय त्यांनी समोर ठेवले आहे.

 

 

हिऱ्यांचे शहर म्हणून ख्याती असलेल्या सूरत शहरामध्ये जगभरातील एकूण हिऱ्यांच्या साठ्यापैकी ९५ टक्के हिऱ्यांना पैलू पाडले जातात. त्याच शहरात असलेल्या लाजपोर मध्यवर्ती कारागृहातील १०७ कैद्यांची टीम दररोज तुरुंगाच्या पॉलिशिंग युनिटमध्ये लहान आकाराच्या हिऱ्यांना कुशलतेने पैलू पाडते. प्रत्येकाच्या कौशल्यानुसार, प्रत्येक कैदी दर महिन्याला सुमारे २० हजार रुपयांपर्यंत कमाई करतो.

 

 

‘आमचे हे जगातील एकमेव कारागृह आहे, जिथे नैसर्गिक हिऱ्यांना पैलू पाडले जातात आणि त्यांना पॉलिश केले जाते. हे युनिट कोणत्याही तक्रारीशिवाय सुरळीतपणे काम करत आहे,’ असे तुरुंगाचे प्रमुख असलेले पोलिस अधीक्षक जे. एन. देसाई यांनी सांगितले. लाजपोर कारागृहातील सुमारे तीन हजार कैद्यांपैकी बहुसंख्य कैदी फर्निचर, रंगकाम आणि शिल्पकला यांसारख्या कौशल्याची आवश्यकता असलेल्या रोजगारामध्ये गुंतलेले आहेत.

 

 

जन्मठेपेची शिक्षा झालेला विपुल मेर (३३) हा डायमंड पॉलिशिंग युनिटमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतो. ‘एक दशकापूर्वी तुरुंगात जाण्यापूर्वी मी हिरा कारागीर होतो. युनिट सुरू झाल्यापासून मी येथे काम करत आहे आणि तुरुंगात असूनही मला मिळणाऱ्या पगारातून मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो.” एखाद्याच्या एकूण कमाईपैकी, कैद्याला वैयक्तिक खर्च म्हणून महिन्याला दोन हजार १०० रुपये ठेवण्याची परवानगी आहे. उर्वरित रक्कम त्यांच्या कुटुंबीयांना पाठवली जाते.

हे ही वाचा:

राहुल बोले नी राऊत डोले…

झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक यांच्या निधनाच्या बातम्या खोट्या

वेळ जवळ आली; आता ‘पृथ्वी’ चंद्राभोवती फिरणार!

विक्रोळीतील पालिका शाळेतील चार विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार

‘११ महिन्यांपूर्वी या तुरुंगात आणल्यानंतर मी डायमंड पॉलिशिंग शिकलो,’ असे सत्यम पाल (२३) याने सांगितले. सत्यम हे महिन्याला सुमारे आठ हजार रुपये कमावतात. सत्यमला ही कला गवसल्याने तो समाधानी आहे. त्याने आपल्याला ही कला येईल, अशी कल्पनाही केली नव्हती. आता तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्याला पॉलिशर म्हणून काम मिळेल, अशी आशा त्याला आहे.

Exit mobile version