राज्यासह देशभरात दिवाळीचा उत्साह असताना दिवाळीच्या हंगामात बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांची आणि पर्यटकांची संख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने अनेकांनी आपल्या कुटुंबीयांसोबत बाहेरगावी जाण्याची योजना आखली होती. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत मुंबई विमातळावरून तब्बल ५ लाख १६ हजार ५६२ प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे.
देशातील सर्वांत व्यस्त विमानतळ म्हणून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची ओळख आहे. शिवाय दिवाळीच्या सुट्टी काळात बाहेरगावी जाणाऱ्या आणि पर्यटक स्थळी भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या काळात विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. मुंबई विमानतळावरुन शनिवार, ११ नोव्हेंबर २०२३ रोजी तब्बल १ हजार ३२ विमानांची ये-जा झाली. यापूर्वी ९ डिसेंबर २०१८ रोजी मुंबई विमानतळावरुन १ हजार ४ विमानांची वाहतूक झाली होती. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मुंबई विमानतळ प्रशासनाने यंदाच्या हिवाळी वेळापत्रकाची घोषणा केली आहे.
मुंबई विमातळाने २९ ऑक्टोबर पासून ते ३० मार्च २०२४ पर्यत हिवाळी वेळापत्रक लागू केले आहे. त्यानुसार गेल्या वर्षीच्या हिवाळी वेळापत्रकाच्या तुलनेत यंदा हिवाळी वेळापत्रकात ८ टक्के उड्डाणाची संख्या वाढविण्यात आली आहे. ११ नोव्हेंबर, १२ नोव्हेंबर आणि १३ नोव्हेंबर या तीन दिवसात ५ लाख १६ हजार ५६२ प्रवाशांनी मुंबई विमानतळावरुन प्रवास केला. त्यात देशांतर्गत मार्गावर सर्वाधिक ३ लाख ५४ हजार ५४१ तर आंतरराष्ट्रीय मार्गावर १ लाख ६२ हजार २१ प्रवाशांनी प्रवास केला. या तीन दिवसात देशांतर्गत दोन हजार १३७ तर आंतरराष्ट्रीय मार्गावर ७५७ विमानांची वाहतूक झाली.
हे ही वाचा:
शेहला रशीद म्हणते, काश्मीर म्हणजे गाझा नाही, श्रेय मोदी, शहांचे!
ऐश्वर्या रायबाबत वादग्रस्त विधान; पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाककडून माफी!
उबाठा सेनेत उद्धव ठाकरेंसकट सर्व सोंगाडे
सुब्रत रॉय यांनी दोन हजार रुपयांत गोरखपूरमधून व्यवसायाची सुरुवात
देशांतर्गत प्रवासासाठी दिल्ली, बंगळुरु आणि चैन्नईकरिता तर आंतरराष्ट्रीय मार्गावर दुबई, लंडन, अबुधाबी आणि सिंगापूरला जाणार्या प्रवाशांची गर्दी होती. शनिवारी १ लाख ६१ हजार ४१९ प्रवाशांनी मुंबई विमानतळावरुन प्रवास केला. त्यात देशांतर्गत मार्गावर १लाख ७ हजार ७६५ तर आंतरराष्ट्रीय मार्गावर ५३ हजार ६८० प्रवाशांचा समावेश आहे.