बांगलादेशमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पक्षाला – अवामी लीगला – पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले आहे. माजी महापौर अनवरुज्जमाँ चौधरी आणि माजी खासदार शफीउल आलम चौधरी नादेल यांच्या घरांवर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) च्या विद्यार्थी संघटनेच्या बॅनरखाली जमलेल्या जमावाने हल्ला करत तोडफोड केली.
‘UNB’ या स्थानिक मीडिया आउटलेटनुसार, सिलहट विमानतळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सय्यद अनिसुर रहमान यांनी सांगितले की, “विद्यार्थी आणि काही स्थानिक नागरिकांच्या उग्र गटाने नादेल यांच्या घरावर हल्ला केला, ज्यामुळे मोठे नुकसान झाले.” स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बुधवारी सुमारे ७०-८० दुचाकींवर आलेल्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत सिलहट शहराच्या हाऊसिंग इस्टेट भागातील नादेल यांच्या घरावर धडक दिली. त्यांनी घरात घुसून सीसीटीव्ही कॅमेरे आणि लॅपटॉप फोडले.
माजी महापौर चौधरी यांच्या घरावर हल्ला
सिलहटच्या पथंतुला भागात अनवरुज्जमाँ चौधरी यांच्या घरावरही जमावाने हल्ला चढवला. फर्निचर आणि घरातील इतर सामानाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. जलालाबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी हारुनुर रशीद यांनी सांगितले की, “आम्हाला माहिती मिळताच आम्ही कारवाई केली. रागावलेल्या विद्यार्थ्यांनी आणि काही स्थानिकांनी हा हल्ला केला.”
‘BDDigest’ या स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, हल्लेखोरांनी घरातील मौल्यवान वस्तू लुटल्या. या हल्ल्याच्या वेळी अनवरुज्जमाँ चौधरी यांच्या घरात त्यांच्या कुटुंबातील कोणीही नव्हते. फक्त दोन केअरटेकर होते, त्यांनाही हल्लेखोरांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा:
हिरवी मूग डाळ प्रथिनांचा खजाना
विराटच्या बोटाला लागलंय; पण आरसीबीच्या नशिबाला?
भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्राची भरारी
ममतांबद्दल दया माया नाही; शिक्षक भरती प्रक्रिया रद्दच, ‘सर्वोच्च’ शिक्कामोर्तब!
गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये शेख हसीना सरकार सत्तेतून हटवल्यानंतर देशात राजकीय हिंसेचा उद्रेक झाला आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार हिंसाचार थांबवण्यात अपयशी ठरले आहे. द ढाका ट्रिब्युनच्या रिपोर्टनुसार, ऑगस्ट २०२४ मध्ये देशभरात अवामी लीगच्या किमान २० नेत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मृतदेह सापडले.
गेल्या काही महिन्यांत अवामी लीगच्या अनेक नेत्यांवर आणि समर्थकांवर क्रूर हल्ले झाले आहेत. जमावाकडून त्यांच्या हत्या, मारहाण, तोडफोड, आणि मालमत्तेची नासधूस करण्यात येत आहे.