लुंगी, ब्लँकेटचा वापर करून पाच कैदी २० फुटी भिंत चढून फरार!

आसाम मधील घटना, पोलिसांकडून फरार कैद्यांचा शोध सुरु

लुंगी, ब्लँकेटचा वापर करून पाच कैदी २० फुटी भिंत चढून फरार!

आसाममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आसामच्या मोरीगाव जिल्हा कारागृहातून पाच कैदी फरार झाले आहेत. विशेष म्हणजे, तुरुंगाची सुरक्षा भेदून २० फुटी भिंत चढून फरार होण्यासाठी कैद्यांनी लुंगी आणि ब्लँकेटचा वापर केला.

फरार झालेले पाचही कैदी पोक्सो कायद्यांतर्गत तुरुंगात शिक्षा भोगत होते. सैफुद्दीन, जियारुल इस्लाम, नूर इस्लाम, मफिदुल आणि अब्दुल रशीद अशी पळून गेलेल्या कैद्यांची नावे आहेत.

मोरीगावचे जिल्हा आयुक्त देवाशिष शर्मा यांनी सांगितले की, कारागृहातून कैदी पळून गेल्याची घटना पहाटे १ ते २ च्या दरम्यान घडली. कैद्यांनी कारागृहाच्या लोखंडी गज कापून बाहेर आले, त्यानंतर तुरुंगाची २० फुटी सुरक्षा भिंत पार करण्यासाठी लुंगी आणि ब्लँकेटचा वापर करून दोरी बनवली आणि कैद्यांनी भिंत पार करत पळ काढला. फरार कैद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कारागृहातील सुरक्षा कर्मचाऱ्यांची काही चूक होती का?, हेही तपासात समोर येईल, असे आयुक्त म्हणाले.

हे ही वाचा : 

हरयाणा भाजपा सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला!

होमगार्ड्ससाठी आनंदाची बातमी, मानधन केले दुप्पट!

भारत सामर्थ्यशाली होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू

इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारी स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर!

दरम्यान, या प्रकरणी तुरुंगाधिकारी प्रशांत सैकिया यांना निलंबित करण्यात आले असून गुवाहाटी येथील दोन सहाय्यक जेलरांना तुरुंगाचे तात्पुरते व्यवस्थापन करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. दुसरीकडे, महानिरीक्षक (तुरुंग) पब्ली गोहेन देखील या घटनेची स्वतंत्र विभागीय चौकशी करणार आहेत.

Exit mobile version