देशभरात कोरोना हाहाकार माजवत असताना केंद्र सरकारने रेमडेसिवीर औषधावरील आयात शुल्क माफ केले आहे. त्यामुळे या संकट काळात कोविड रुग्णांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
रेमडेसिवीर औषधाचा सध्या राज्यात प्रचंड तुटवडा जाणवत आहे. ठिकठिकाणी रुग्ण या औषधाच्या प्रतिक्षेत आहेत. यापूर्वी केंद्र सरकारने निर्णय घेऊन रेमडेसिवीर औषधाच्या किंमतीत देखील घट केली होती. त्यानंतर आता आयात शुल्क माफ केल्यामुळे हे औषध मोठ्या प्रमाणात आयात करून देशांतर्गत गरज पूर्ण करण्यासाठी वापरले जाऊ शकेल.
देशातील या औषधाचा तुटवडा लक्षात घेऊन भारत सरकारने यापूर्वीच रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे औषध देशांतर्गत बाजारपेठेसाठी खुले झाले. त्याबरोबरच रेमडेसिवीरच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या घटक पदार्थाच्या निर्यातीवर देखील मोदी सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे देशांतर्गत रेमडेसिवीर उत्पदानाला देखील चालना मिळू शकेल.
रेमडेसिवीर हे औषध कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाते. सध्या कोविडचे रुग्ण प्रमाणाबाहेर वाढल्याने महाराष्ट्रात या औषधाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे विविध मार्गांनी हे औषध राज्याला जास्ती जास्त प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या औषधाचे उत्पादन निर्माण करणाऱ्या ब्रुक फार्मा या दीव-दमणच्या औषध उत्पादक कंपनीकडून आणायची तरतूद केली आहे.