उत्तर भारतात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा!

भारतीय हवामान विभागाचा रेड अलर्ट

उत्तर भारतात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा!

भारतीय हवामान विभागाने संपूर्ण उत्तर भारतात रविवारी तीव्र उष्णतेची लाट येऊ शकते, असा इशारा दिला आहे. शनिवारी, सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत उष्णतेची लाट कायम होती. शनिवारी सफदरजंग येथे तब्बल ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे प्रमाण शुक्रवारच्या कमाल तापमानापेक्षा ०.१ सेल्सिअसने अधिक आहे.भारतीय हवामान विभागाने रविवारी ‘रेड अलर्ट’ दिला असून सोमवार ते बुधवारी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. या कालावधीत तापमान ४४ अंश सेल्सिअस ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते. त्यामुळे सूर्याच्या तीव्र किरणांशी संपर्क येऊन उष्म्याशी संबंधित आजार होऊ नयेत, यासाठी नागरिकांनी घरातच राहावे, असा सल्ला भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

‘तीव्र उष्म्यामुळे सर्व वयोगटांतील नागरिकांना उष्म्याशी संबंधित आजार होण्याची तसेच, उष्माघात होण्याची भीती आहे. विशेषतः अर्भक, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य दीर्घ आजार असणाऱ्यांना उष्म्याशी संबंधित आजार होण्याची भीती आहे,’ असे भारतीय हवामान विभागाने नमूद केले आहे.संपूर्ण उत्तर भारतात तीव्र उष्म्याची लाट पसरली आहे. राजस्थानमधील बारमेर येथे ४६.९ अंश सेल्सियस या कमाल तापमानाची नोंद झाली. राजस्थानमधील बहुतेक सर्व भागांत गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट जाणवत आहे. ही परिस्थिती या आठवड्यातही कायम राहील, असे जयपूरच्या हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले!

कन्हैय्या कुमारला मारणाऱ्यांना कोणताही पश्चात्ताप नाही!

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८०८८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

मुंबईतील वरळी येथे धक्कादायक घटना, कारमध्ये २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार

चंडिगडमध्येही ४४.५ अंश सेल्सिअस या कमाल तापमानाची नोंद झाली. एरवी या काळातील सर्वसाधारण तापमानापेक्षा सहा अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झाली. हरयाणातील रोहतक आणि सिरसा येथेही ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.हवामानाची परिस्थिती सांगण्यासाठी भारतीय हवामान विभागाकडून तीन प्रकारच्या रंगांची माहिती दिली जाते. हवामानाबाबत नागरिकांना सावध करण्यासाठी ‘यलो अलर्ट’ दिला जातो. तर, हवामानाच्या तीव्र बदलाबाबत नागरिकांना सज्जता राखण्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला जातो. तसेच, सर्वोच्च सतर्कता राखण्यासाठी म्हणजे जेव्हा एखाद्या अत्यंत तीव्र हवामानाच्या घटनेसाठी लोकांकडून अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असते, तेव्हा ‘रेड अलर्ट’ जाहीर केला जातो.

Exit mobile version