नवी मुंबईत अनधिकृत झोपड्या मिळताहेत लाखात

नवी मुंबईत अनधिकृत झोपड्या मिळताहेत लाखात

नवी मुंबई पालिकेच्या हद्दीत सध्या अनधिकृत बांधकामांचे साम्राज्य वाढत चालले आहे. शहरामध्ये झोपडी उभारून ती पुन्हा नव्याने चांगल्या भावाने विक्री करायची हे सुरु झालेले आहे. त्यामुळेच या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. परंतु नुकतेच अशी कारवाई करताना मात्र दोन गटांत हाणामारीची घटना घडली आहे.

एपीएमसी आवारातील ही घटना आहे. सेक्टर १९ मध्ये अनधिकृत झोपडी विकण्याचा वाद विकोपाला गेला. या वादामुळे दोन गटांमध्ये चांगलीच मारहाण झाली. यामध्ये एकाला जबरदस्त मार लागलेला आहे. हत्या करण्याच्या हेतूनेच संबंधित व्यक्तीला मारहाण झाली. सध्या या इसमावर आता उपचार सुरु आहेत. एपीएमसीच्या आवारात राजरोसपणे झोपडी बांधण्याचे सत्र सुरू आहे. मुख्य म्हणजे या झोपड्यांची किंमत ही ८० हजार ते १ लाख इतकी आहे. त्यामुळेच हे वाद आता चव्हाट्यावर आलेले आहेत. एकाने या ठिकाणी झोपडी आपल्या मित्राला राहयला दिली. त्यामुळेच या दोन मित्रांमध्ये टोकाचा वाद या झोपडीवरून झालेला आहे.

हे ही वाचा:

‘उठा उठा दिवाळी आली…’ जाहिरातीतील ‘अलार्म काकां’ची एक्झिट!

पुढील दोन दिवस राज्यात कोसळधारा!

अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यामुळे पंजाब मध्ये काँग्रेसची आत्महत्या

क्वाड बैठकीपूर्वी मोदी-मॅक्रॉन संभाषण

नवी मुंबई पालिकेच्या हद्दीतील जुहूगाव, घणसोली, नेरूळ, वाशी गाव, कोपरखैरणे, ऐरोली, दिघा गावठाण परिसरात, सिडको तसेच औद्योगिक विभागाच्या जागेवर बिनधास्तपणे अनधिकृत इमारतींची बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अतिक्रमण विभाग या बांधकामांवर कारवाई न करता सर्वसामान्य नागरिकांच्या भाजी मार्केट तसेच इतर व्यवसायांवर कारवाई करत आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात या भेदभावाबाबत चांगलाच रोष निर्माण झाला असून, अतिक्रमण विभागाच्या कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे. नवी मुंबईमध्ये विनापरवाना अनधिकृत इमारती उभारणारे गोवंडी, भिवंडी, काळबादेवी, मुंब्रा या ठिकाणची बांधकाम व्यावसायिक आहेत. या बांधकामांना काही गावातील लोकांचा विरोध आहे.

Exit mobile version