निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर आता शिवसेनेची म्हणून जी कार्यालये, शाखा आहेत त्यासाठी आता संघर्ष सुरू झाला आहे. दादर येथे असलेल्या शिवसेना भवनाचाही मुद्दा त्यातूनच उपस्थित होत आहे. हे शिवसेना भवन नेमके कुणाचे? याच मुद्द्यावर आता चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ऍड. योगेश देशपांडे यांनी शिवसेनाभवन ही विश्वस्त संस्था आहे का, असेल तर मग तिचा राजकीय वापर कसा काय होतो, असा सवाल चॅरिटी कमिशनर आणि महाराष्ट्र शासनाच्या कायदा व न्याय विभागाकडे उपस्थित केला आहे.
योगेश देशपांडे यांनी असे पत्र या दोन्ही विभागांना पाठवले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रात दिलेल्या बातमीनुसार खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, ‘शिवसेना भवन ही शिवाई ट्रस्टची संपत्ती आहे तर दैनिक सामना ही प्रबोधन ट्रस्टची संपत्ती आहे.’
यावरून देशपांडे यांनी मुद्दा उपस्थित केला आहे की, शिवाई ट्रस्ट असा उल्लेख जर संजय राऊत करत असतील तर याचा अर्थ ती विश्वस्त संस्था आहे. यासंदर्भात आम्ही चॅरिटी कमिशनरच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातून आम्हाला अपेक्षित माहिती मिळाली नाही. आमचे काही सवाल आहेत. ते म्हणजे, जर ही विश्वस्त संस्था असेल तर राजकीय कार्यक्रमांसाठी तिचा वापर काही दशके कसा काय केला जातो? जर ही कृती विश्वस्त संस्थेच्या उद्दिष्टांना हरताळ फासणारी आहे तर विश्वस्तांना का निलंबित केले जात नाही किंवा काढले जात नाही? प्रशासकांची नियुक्ती तिथे का केली जात नाही? जे काही नुकसान यादरम्यान झाले ते विश्वस्तांकडून का वसूल केले जात नाही?
हे ही वाचा:
या खासदाराच्या घरी आहेत ५० घरटी.. १०० चिमण्यांचा रोज चिवचिवाट
व्हीपवरून शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात कलगीतुरा
फडणवीस स्पष्टच म्हणाले, भाजप- शिवसेनेचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरलाय
शिवसेनेचे विधीमंडळातील कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात..शिवालयही येणार
आम्ही पाठवलेले हे पत्र ही एक तक्रार आहे असे समजून यासंदर्भात आपण जनहितार्थ माहिती द्यावी आणि आपल्या निरीक्षकांच्या माध्यमातून याबाबतचा एक अहवाल तयार करावा. हेच प्रश्न देशपांडे यांनी शासनाच्या कायदा आणि न्याय विभागाला लिहिलेल्या पत्रातही उपस्थित केले आहेत. याबाबत चॅरिटी कमिनशरना आदेश द्यावेत अशी मागणीही करण्यात आली आहे. एकंदरीतच त्यातून शिवसेना भवन नेमके कुणाचे यावर कदाचित प्रकाश टाकला जाऊ शकेल.