शनिवारी, २९ जून रोजी भारत टी-२० विश्वचषक २०२४च्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी सामना करणार आहे. बार्बाडोसमधील सामन्यात पावसाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. गयाना येथे झालेल्या उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध सामन्यातही पावसाने असाच व्यत्यय आणला होता.
सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवला नसल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने उपांत्य फेरीसाठी २५० मिनिटांचा अतिरिक्त वेळ राखून ठेवला होता. परंतु अंतिम फेरीचे काय? २९ जून रोजी बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल येथील खेळ पावसाने रद्द केल्यास काय होईल?
हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता सुरू होण्याची अपेक्षा आहे, परंतु या सामन्यात पावसाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपांत्य सामन्याप्रमाणे या खेळासाठीही अतिरिक्त वेळ दिला जाऊ शकतो. याचा अर्थ असा की सुरुवातीच्या वेळेपासून चार तास १० मिनिटांच्या विलंबानंतरही पूर्ण खेळ होऊ शकतो. म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार प्रत्येक बाजूचा पूर्ण २० षटकांचा खेळ सकाळी १२.१० वाजता सुरू होऊ शकतो.
आयसीसीच्या नियमानुसार, अंतिम सामना २० षटकांचा होऊ शकला नाही तरीही शनिवारीच खेळ संपवण्याचे आयोजकांचे उद्दिष्ट असेल. ‘नियोजित दिवशी खेळात व्यत्यय आल्यास, पंचांनी उपलब्ध अतिरिक्त वेळ वापरावा आणि आवश्यकता भासल्यास, त्या दिवशी निकाल लागण्याचा प्रयत्न करण्यासाठी षटकांची संख्या कमी करावी. सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस नसल्यास मैदान, हवामान आणि प्रकाश यांच्या संदर्भात त्यांचे निर्णय घेताना पंचांनी त्या दिवशी निकाल मिळविण्यासाठी सामन्याच्या नियोजित दिवशी जास्तीत जास्त खेळ करण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे,’ असे आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांत नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
दिलासा देणारे दिलासा मागणारे महायुतीचे बजेट
चर्चा मुख्यमंत्रीपदाची, पण जागावाटपाचा पत्ता कुठाय ?
हिजाबच्या नावावर महाराष्ट्रात कोण खोडसाळपणा करू पाहत आहे?
अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा; पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी होणार
दोन्ही संघांनी प्रत्येकी किमान १० षटके खेळली तरच निकाल येऊ शकतो. जर पावसाने खेळ अजिबात होऊ दिला नाही, तर सामना रविवार, ३० जूनला होऊ शकतो.
‘निकाल येण्यासाठी प्रत्येक संघाला कमीत कमी दहा षटकांची फलंदाजी करण्याची संधी मिळणे अपेक्षित आहे. जर ती साध्य करण्यासाठी किमान षटके टाकण्याची परवानगी देण्यासाठी आवश्यक कट ऑफ वेळेपर्यंत खेळ पुन्हा सुरू झाला नाही तर, त्या दिवसासाठी खेळ सोडून दिला जाईल आणि सामना पूर्ण करण्यासाठी किंवा पुन्हा खेळण्यासाठी राखीव दिवसाचा वापर केला जाईल,’ असे आयसीसीची मार्गदर्शक तत्त्वे सांगतात.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्यास आयसीसीकडे सामना दुसऱ्या दिवशी खेळवण्याचा पर्याय आहे. दुसऱ्या डावातील पहिला चेंडू टाकण्यापूर्वी सामना थांबवल्यास २० षटकांचा पूर्ण खेळ होईल. मात्र, सामन्याचे पहिले षटक दुसऱ्या डावात टाकले तर डीएलएसचे नियम लागू होतील.
“जर राखीव दिवसाचा वापर अपूर्ण सामना सुरू ठेवण्यासाठी केला गेला तर राखीव दिवस वापरला जाईल. शेवटचा चेंडू नियोजित दिवशी टाकला गेला होता, त्याच गृहीतकाने राखीव दिवसाला खेळ पुन्हा सुरू होईल. नाणेफेक झाल्यावर सामना सुरू होईल. जर नियोजित दिवशी नाणेफेक झाली आणि त्यानंतर कोणताही खेळ झाला नाही, तर नाणेफेकीचा निकाल आणि दोन्ही संघ राखीव दिवशी खेळ पुढे चालू ठेवतील,” असे आयसीसीने म्हटले आहे.
उदाहरण १: दोन्ही संघाच्या २० षटकांनी सामना सुरू होतो आणि नवव्या षटकामध्ये व्यत्यय आल्यास दोन्हीकडची १७ षटके कमी केली जातील आणि खेळ पुन्हा सुरू होईल. मात्र दुसरा चेंडू टाकण्यापूर्वी पाऊस पडल्यास आणि दिवसभराचा खेळ रद्द झाल्यास सुधारित षटकांत सामना पुन्हा सुरू न झाल्याने, राखीव दिवशी सामना मूळ २० षटकांनिशी सुरू केला जाईल. किंवा राखीव दिवसात आवश्यकता वाटल्यास षटके कमी केली जातील.
उदाहरण २: उदाहरण एक प्रमाणेच सुरुवात म्हणजे सामना दोन्ही संघाच्या २० षटकांनी सुरू झाल्यास आणि नवव्या षटकामध्ये व्यत्यय आल्यास प्रत्येक संघाची १७ षटके कमी केली जातील आणि खेळ पुन्हा सुरू होईल. खेळ सुरू झाल्यावर एक षटक टाकल्यानंतर पाऊस पडल्यास दिवसभरासाठी खेळ सोडून दिला जाईल. सामना पुन्हा सुरू झाल्यामुळे, तो राखीव दिवशी खेळला जाईल. दोन्ही संघ प्रत्येकी १७ षटके खेळतील. राखीव दिवसादरम्यान आवश्यक असल्यास षटके आणखी कमी केली जातात.
निष्कर्ष
आयसीसीने त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, त्यांना शनिवारी अंतिम सामना संपवायचा आहे. मग हा सामना कमी वेळ खेळला गेला तरी आयसीसीला हरकत नाही. अशावेळी डकवर्थ लुइस नियम वापरला जाईल. परंतु पावसामुळे आयसीसीने सामना रविवार, ३० जून रोजी घेतल्यास आश्चर्य वाटायला नको.