मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊन लागणार का याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांची दिवसभरातील संख्या २० हजारांच्यावर गेल्यास मुंबईत लॉकडाऊन करावं लागणार असल्याचे चहल ‘एनडीटीव्ही’शी बोलताना म्हणाले.
मुंबईत सोमवारी ३ जानेवारीला ८ हजार ८२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, सोमवारी ६२२ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इकबाल चहल यांनी मोठे विधान केले आहे. मुंबईतील रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली आणि एका दिवसात २० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास लॉकडाऊन करावंच लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पालिका प्रशासन सतर्क असून महापालिकेकडे ३० हजार पेक्षा जास्त खाटा सध्या उपलब्ध आहेत. तर ३ हजार खाटा सध्या भरलेल्या आहेत. औषधे आणि व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत, अशी माहिती इकबाल चहल यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण
७० वर्षीय नोकराची हत्या, मालकाला अटक
मंदिराच्या दारात लटकवले गोमांस
डाव्याच नव्हे तर उजव्या एनजीओंचेही परवाने रद्द
राज्याचे आरोग्य मंत्री यांनी मात्र, सध्या राज्यात लगेच लॉकडाऊन करण्याचा विचार नसल्याचे म्हटले आहे. ज्या दिवशी ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागे त्या दिवसापासून लॉकडाऊन लावण्यात येईल असे त्यांनी म्हटले होते. मात्र, रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी कठोर निर्बंध लावण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.