वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामध्ये पहिल्या दिवसाअखेर भारतीय संघ मजबूत स्थितीत दिसत आहे. भारतीय संघाने धावफलकावर १४६ धावा चढवल्या असून त्या बदल्यात भारताचे तीन फलंदाज बाद झाले आहेत. शनिवार, १९ जून रोजी वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना अपेक्षेप्रमाणे वेळेत सुरू झाला. पण खराब प्रकाशामुळे खेळ लवकर संपवावा लागला. खेळ थांबवला गेला तेव्हा न्यूझीलंड संघाकडून ६४.४ षटके टाकण्यात आली होती.
१८ जून रोजी सुरु होणारा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हा पावसामुळे पहिल्या दिवशीच रद्द करण्यात आला. शनिवार १९ जून रोजी तरी हा सामना सुरु होणार का? याकडे जगभरातील क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले होते. पण वरुण राजाने कृपा केल्यामुळे शनिवार १९ जून रोजी हा सामना ठरल्या वेळी सुरळीत सुरु झाला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने गोलंदाजीचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री लवकरच घराबाहेर पडणार
काँग्रेसला पुन्हा स्वबळाची आठवण
अजित पवारांच्या कार्यक्रमात कोविड नियमांना हरताळ
स्विस बँकेतील काळ्या पैशाचे वृत्त सफेद झूठ
भारतीय संघाकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण त्यानंतर न्यूझीलंड संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत केलेली दिसत आहे. या दोन्ही सलामीवीरांना बाद करत माघारी धाडण्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना यश आले आहे. २१ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जेमिसनने रोहित शर्मा याला बाद केले. टीम साऊदीने स्लिपमध्ये एक अप्रतिम झेल घेत रोहित शर्माचा खेळ संपवला. तर २५ व्या षटकात वॅग्नरने शुभमन गिलचा अडथळा दूर केला. शर्माने ३४ धावा केल्या असून गिल हा २८ धाव करून बाद झाला. पुढे चेतेश्वर पुजारा हा देखील ५४ चेंडूत ८ धावा करून बाद झाला. ट्रेंट बोल्टने त्याला पायचीत केला.
सध्या भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे हे दोघे मैदानावर टिकून आहेत. यापैकी विराट कोहलीने १२४ चेंडूत ४४ धावांची खेळी केली आहे, तर अजिंक्य रहाणे ७९ चेंडूत २९ धावांवर खेळत आहे.