लवकरच टी- २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला मिळणारी रक्कम जाहीर केली आहे.
टी- २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला १६ लाख डॉलरचा धनादेश देऊन गौरवण्यात येणार आहे.
यंदा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीमध्ये संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे ही स्पर्धा रंगणार असून स्पर्धेच्या मुख्य फेरीला २३ ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. या स्पर्धेच्या उपविजेत्या संघाला आठ लाख डॉलर देण्यात येणार आहेत. उपांत्य फेरी गाठणाऱ्या दोन संघांना प्रत्येकी चार लाख डॉलर देण्यात येणार आहेत.
हे ही वाचा:
‘जरा दोन पेंग्विनचे लाड कमी करा आणि मुंबईचे रस्ते तरी दुरुस्त करा’
रेल्वेची ‘पिकदानी पाकिटे’ संकल्पना काय आहे? वाचा सविस्तर
पुष्पक एक्स्प्रेस बलात्कार प्रकरणातील आठही आरोपींच्या गठड्या वळल्या!
ठाण्यात ‘व्हाईटनर, नेलपेंट रिमूव्हर, मॅजिक मशरूम’ची नशा!
मागीलवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली होती. २०१६ मध्ये भारतात झालेल्या अखेरच्या टी- २० विश्वचषकात वेस्ट इंडिजने इंग्लंडला पराभूत करून स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. यंदा मर्यादित प्रेक्षकांच्या उपस्थितीत अमिरातीमध्ये ही स्पर्धा पार पडणार असून त्याचे यजमानपद ‘बीसीसीआय’ भुषवत आहे. पारितोषिकांची रक्कम जाहीर करतानाच ‘आयसीसी’ने अन्यही काही सूचना केल्या आहेत.
- यंदा प्रथमच पंच निर्णय आढावा प्रणालीचा (डीआरएस) टी-२० मध्ये समावेश करण्यात येणार आहे. एका डावात दोन वेळा पंचांच्या निर्णयाविरुद्ध दाद मागता येऊ शकते.
- प्रत्येक सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये १० षटके झाल्यावर अडीच मिनिटांची जाहिरातीची विश्रांती घेण्यात येणार आहे.
- उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
- प्रत्येक सामन्यातील विजेत्या संघाला ४० हजार डॉलर्स देण्यात येतील.