मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ बुधवारी संध्याकाळी मुंबईहून एलिफंटाकडे जाणारी ‘नीलकमल’ नावाच्या प्रवासी बोटीला नौदलाची बोट धडकून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तर, बुडालेल्या बोटीतून १०१ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. यानंतर या दुर्घटनेतून सुखरूप बचावलेल्या काही प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी या थरारक घटनेची माहिती दिली आहे.
“एक स्पीड बोट आमच्या बोटीजवळ काही स्टंट करत असल्याचे समजून मी व्हिडीओ काढत होतो. त्याचवेळी अचानक या स्पीडबोटने अचानक आमच्या बोटीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, स्पीडबोटीमधला एक प्रवासी हवेत उडाला आणि आमच्या डेकवर माझ्या शेजारी येऊन पडला. त्याला दुखापत झाली होती,” असे व्हायरल व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या गौतम गुप्ता (वय २५ वर्षे) याने सांगितले.
गौतम गुप्ता हा या अपघातातून सुखरूप बचावला असून तो आणि त्याची चुलत बहीण रिंटा गुप्ता (वय ३० वर्षे) हे दोघेही सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, त्यांची मावशी मात्र, अद्याप बेपत्ता आहे. बुधवारी गौतम गुप्ता हा त्याची मावशी आणि तिच्या मुलीसह एलिफंटा गुहा बघायला जात होता तेव्हा हा अपघात घडला. या दोघीही उत्तर भारतातील त्यांच्या मूळ गावाहून मुंबईला आल्या होत्या.
या अपघातात बचावलेल्यांनी सांगितले की, आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये काय करायचे याचे कोणालाच ज्ञान नव्हते. बोटीची टक्कर झाल्यावरही उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना कोणतेही मार्गदर्शन केले नाही किंवा त्यांनी यासंबंधी कोणतीही घोषणा केली नाही. टक्कर मोठी असल्याचे लक्षात घेऊन प्रवाशांनीचं सुरक्षेसाठी लाइफ जॅकेट घेण्यास धावाधाव सुरू केली.
आणखी एक प्रवासी राम मिलन सिंग (वय ४१ वर्षे) हे बंगळुरूहून आपल्या दोन सहकाऱ्यांसह आणि मुंबईस्थित त्यांच्या मेव्हण्यासोबत एलिफंटा लेणी सहलीसाठी जात होते. त्यांनी देखील सांगितले की, टक्कर होताच कसे घाबरलेल्या प्रवाशांनी पटकन लाइफ जॅकेट पकडले आणि बोट बुडण्यापूर्वी पाण्यात उडी मारली. सिंग पुढे म्हणाले की, ते स्वतः आणि त्यांचा मेव्हणा वाचले असून अजूनही त्यांच्या दोन सहकाऱ्यांबद्दल त्यांना कोणतीही माहिती मिळालेली नाही. ज्यांना सिंग यांनी शेवटचे लाइफ जॅकेट घालून समुद्रात तरंगताना पाहिले होते.
सिंग म्हणाले की, “टक्कर झाल्यानंतरचा तो गोंधळाचा क्षण होता कारण बोटीच्या पुढच्या भागातून अचानक समुद्राचे पाणी बोटीतून वर येऊ लागले होते. त्यामुळे बोट तिरपी होण्याआधी प्रवाशांनी वरच्या डेकच्या दिशेने धावायला सुरुवात केली. जहाज झुकल्यामुळे आणि वरच्या भागात असलेल्या गर्दीमुळे गोंधळ उडाला. माझ्या मनात काय आले माहीत नाही, बोट झुकायला लागल्यावर, मी स्वतःला वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे असे समजून पाण्यात उडी मारण्याचा निर्णय घेतला. यानंतर अनेकांनी तोच मार्ग निवडला. शेवटी मदत पोहोचली तेव्हा आम्ही सुमारे अर्धा तास समुद्रात तरंगत होतो.”
हे ही वाचा..
जम्मू- काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक; लष्कराच्या जवानांकडून पाच दहशतवाद्यांचा खात्मा
प्रवासी बोटीला धडकणाऱ्या नौदलाच्या स्पीड बोट चालकावर गुन्हा दाखल
उद्धव ठाकरे फडणवीसांना नागपूरचे कलंक म्हणतात आणि त्यांना भेटायलाही येतात, याची कीव येते!
भोजनालयात धूम्रपान : मलेशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांना दंड
सिंग म्हणाले की, सुरुवातीला स्पीडबोट काही अंतरावर होती. त्यांच्या काही हरकती सुरू होत्या आणि म्हणून बोटीतील अनेक प्रवाशांनी त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. त्यानंतर अचानक ती स्पीडबोट त्यांच्या बोटीकडे वळले आणि जवळून जात असताना जोरदार धडक झाली.
कुरळ येथील नथाराम चौधरी (वय २४ वर्षे) या एका प्रवाशाने सांगितले की, दुअसरे जहाज वाचवण्यासाठी येईपर्यंत तो समुद्रात तरंगत राहण्यात आणि काही अंतरावर पोहण्यात यशस्वी झाला. पुढे तो म्हणाला की, त्यांच्या बोटीमधील अनेक लोक पुढे काय होणार आहे याची माहिती नसताना त्याचं स्पीडबोटचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात व्यस्त होते.