माझे मराठी भाषेवर प्रेम आहे. विद्वानांसारखा मी मराठी भाषेचे प्राविण्य माझ्याकडे नाही आहे, मात्र मराठी बोलण्याचा प्रयत्न, मराठीचे नव-नवे शब्द शिकण्याचा प्रयत्न सतत करत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याने याच दरम्यान मराठी साहित्य संमेलन पार पडत असल्याने ते विशेष आहे, अशा शब्दांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेबद्दल आपले ममत्व व्यक्त केले.
नवी दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. लोकसंस्कृती, संत साहित्याच्या अभ्यासक, संशोधक डॉ. तारा भवाळकर यंदाच्या संमेलनाच्या अध्यक्षा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संमेलनाला संबोधित करताना मराठी भाषेवरील आपले प्रेम दाखवत मराठी भाषेचे कौतुक केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील योद्धे, स्वातंत्र्य चळवळीतील वीर, साधू संतांचाही उल्लेख केला. तसेच छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘छावा’ चित्रपटाचाही उल्लेख केला.
मोदींनी सांगितले की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे एक भाषा, राज्यापुरते मर्यादित नाही. यामध्ये एक स्वातंत्र्याचा सुगंध, देशाचा सांस्कृतिक वारसा आहे. ‘ज्ञानोबा तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली अतिशय मनापासून अभिवादन करते.’ १८७८ मध्ये पहिल्या आवृत्तीपासून, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने देशातील १४७ वर्षांचा प्रवास पाहिला आहे. महादेव गोविंद रानडे, हरिनारायण आपटे, माधव श्रीहरी अणे, शिवराम परांजपे, वीर सावरकर यांसारख्या महान लोकांनी याचे अध्यक्षपद भूषविले आहे. आज या गौरवपूर्ण परंपरेशी जोडण्याची मला संधी मिळाली आहे.
देशातील तमाम मराठी प्रेमींना या आयोजनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज जागतिक मातृभाषा मराठी दिवस आहे. त्यामुळे संमेलनासाठी तुम्ही दिवसही चांगला निवडला. मी जेव्हा मराठी भाषेबद्दल विचार करतो तेव्हा मला संत ज्ञानेश्वरांचे वचन आठवणे स्वाभाविक आहे. ‘माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके’ म्हणजे मराठी भाषा अमृतापेक्षाही गोड आहे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीला ३०० वर्षे झाले आहेत आणि काही दिवसांपूर्वी बाबसाहेब लिखित संविधानालाही ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्राच्या धरतीवर मराठी भाषिक महापुरुषाने १०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीज पेरले होता. आज याचे वटवृक्षात रुपांतर झाले असून ही संघटना आपले शताब्दी वर्षे साजरा करत आहे. वेदांपासून विवेकानंदांपर्यंत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या १०० वर्षांपासून भारताची महान परंपरा आणि संस्कृती नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक अनोखा विधी पार पाडत आहे.
हे ही वाचा :
भूतानचे पंतप्रधान हिंदीत म्हणाले, ‘मोदी माझे मोठे भाऊ, त्यांच्याकडूनच मार्गदर्शन घेईन’
मुंबईत ‘हाउसिंग जिहाद’; हिंदूंना अल्पमतात आणण्याचा डाव!
रेखा गुप्तांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांना सुनावले, आम्हाला काम करू द्या!
सिनेटने मंजुरी दिलेले FBI चे भारतीय वंशाचे संचालक काश पटेल कोण आहेत?
संघाने माझ्यासह लाखो लोकांना जगण्याची प्रेरणा दिली आहे आणि संघामुळेच मला मराठी भाषेशी जोडण्याची संधी मिळाली. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. देश-दुनियात १२ करोडपेक्षा जास्त मराठी भाषिक लोक आहेत. समर्थ रामदास म्हणतात, “मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा”, “आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे”, “महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे”. मराठीमध्ये शूरता, वीरता, सौंदर्य, संवेदना, समानता, सुसंवाद, अध्यात्माचा आवाज, आधुनिकतेची लाट, भक्ती-शक्ती आणि युक्ती आहे.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या संतानी मराठी भाषेच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली. ग.दि. माडगुळकर आणि सुधीर फडकेंच्या गीत रामायणाने टाकलेला प्रभाव सर्वांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव पेशवा अशा वीर मराठ्यांनी दुश्मनांना पाणी पाजले. स्वातंत्र्याच्या लढाईत वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, वीर सावरकर सारख्या सेनानींनी इंग्रजांची झोप उडविली होती. जोतीबा फुले, सावित्री बाई फुले, महर्षी कर्वे, बाबासाहेब आंबेडकर सारख्या महान व्यक्तिमत्त्वांनी नवीन युगाच्या विचारसरणीला चालना देण्याचे काम केले होते.
मोदींनी छावा चित्रपटाचा केला उल्लेख
ते पुढे म्हणाले, मुंबई ही देशाची राजधानी आहे. जेव्हा मुंबईचा उल्लेख केला जातो तेव्हा चित्रपटांशिवाय साहित्याची किंवा मुंबईची चर्चा पूर्ण होणार नाही. महाराष्ट्राच्या मुंबईने मराठी सिनेमा बरोबर हिंदी सिनेमालाही एक नवी उंची दिली आहे आणि आजकाल ‘छावा’ चित्रपटाचा गाजावाजा असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संमेलनाला संबोधित करताना म्हणाले, संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांचे भाषण झाल्यानंतर मी त्यांना म्हणालो, ‘फार छान’ यावर त्या म्हणाल्या ‘मला पण गुजराती आवडते’, यावर सभागृहात एकच हशा पिकला.