कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांच्या हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी पल्लवी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. घरगुती वादातून जीवघेणा प्रकार उघडकीस येत असल्याने तपासकर्त्यांनी त्यांची मुलगी कृती हिलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६८ वर्षीय निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याची पत्नी पल्लवीसोबत झालेल्या जोरदार वादानंतर हत्या झाली. पल्लवीने स्वतःवरील नियंत्रण गमावले आणि ओम प्रकाश यांच्या डोळ्यावर मिरची पावडर टाकून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला.
टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, पीटीआय सूत्रांचे म्हणणे आहे की, पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येनंतर पत्नी पल्लवीने लगेचच एका मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला आणि म्हटले की, “मी त्या राक्षसाला मारले आहे.” दरम्यान, तपासकर्त्यांना असा विश्वास आहे की ही हत्या कुटुंबातील दीर्घकाळापासूनच्या तणावामुळे घडली. यामध्ये कर्नाटकातील दांडेली येथील जमिनीच्या मालमत्तेचा वाद देखील समाविष्ट आहे.
सूत्रांनी सांगितले की, जोडप्यामध्ये वारंवार भांडणे होत असत आणि पल्लवीने काही महिन्यांपूर्वी तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशनला भेट दिली होती. जेव्हा तिच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही, तेव्हा तिने पोलिस स्टेशनबाहेर धरणे आंदोलनही केले होते. दरम्यान, पल्लवी या ‘स्किझोफ्रेनिया’ नावाच्या गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा :
फिलिपाइन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीची दुसरी तुकडी पाठवली
आजच्या धोरणांवर ठरेल हजार वर्षांचं भविष्य
राहुल गांधी नॅशनल हेराल्ड प्रकरणातून वाचू शकणार नाहीत
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीकडे पाहिले जात आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे. मृत पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा कार्तिकेश याने तक्रारीत म्हटले की, माझी आई, पल्लवी आणि माझी बहीण, क्रुती या नैराश्याने ग्रस्त आहेत आणि त्या माझ्या वडिलांशी वारंवार भांडत होत्या. माझ्या वडिलांच्या हत्येत त्यांचा हात असल्याचा मला दाट संशय आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.