निवडणूक रोखे कोणी दिले, याचा तपशील जाहीर करण्यास ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि नितीश कुमार यांच्या जनता दल संयुक्त पक्षांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यांच्या कार्यालयात निवडणूक रोखे कोण देऊन गेले, याबाबत आपल्याला माहीत नसल्याचे या पक्षांच्या वतीने सांगितले जात आहे. तृणमूलच्या मते, त्यांच्याकडे निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्यांची माहिती नाही.
सन २०१८-१९मधील रोख्यांची माहिती देण्यास तृणमूल आणि जनता दल संयुक्तने नकार दिला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधील एका वृत्तानुसार, २७ मे २०१९मध्ये तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, रोख्यांबाबतही भाष्य केले होते. तेव्हा तृणमूलने ‘बहुतांश रोखे आमच्या कार्यालयात पाठवले गेले आणि ड्रॉप बॉक्समध्ये टाकण्यात आले किंवा जे आमच्या पक्षाला पाठिंबा देतात, अशा व्यक्तींच्या माध्यमातून पाठवण्यात आले’, असे सांगितले. यातील अनेक देणगीदारांनी अज्ञात राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अशा परिस्थितीत निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्यांची नावे आणि अन्य तपशील आमच्याकडे नाही, असेही तृणमूल पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
हे ही वाचा:
निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला सात हजार कोटींची देणगी!
“मतांसाठी, सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार आहेत?”
अजमेरमध्ये साबरमती एक्स्प्रेसला अपघात; मालगाडीला धडकून चार डबे रुळावरून घसरले
सर्वाधिक निवडणूक रोखे देणाऱ्या कंपनीकडून ५०९ कोटी द्रमुक पक्षाला
तर, जनता दल संयुक्तने निवडणूक आयोगाला ३० मे, २०१९ रोजी सांगितल्यानुसार, ’१३ एप्रिल २०१९ रोजी पाटण्यात कोणीतरी त्यांच्या कार्यालयात आले आणि त्यांनी सीलबंद लिफाफा दिला. जेव्हा तो उघडला तेव्हा त्यात प्रत्येकी एकेक कोटीचे १० निवडणूक रोख होते. अशा परिस्थितीत देणगीदारांची अधिक माहिती देण्यास आम्ही असमर्थ आहोत,’ असे स्पष्ट केले होते. देणगीदारांची माहिती मिळवण्याचा आम्ही प्रयत्नही केला नाही, असे पक्षातर्फे सांगण्यात आले.
जनता दल संयुक्तने एप्रिल २०१९मध्ये १३ कोटी रुपयांपैकी तीन कोटी देणगीदारांचा तपशील दिला आहे. तर, तृणमूलने १६ एप्रिल २०१८पासून ते २२ मे २०१९ दरम्यान निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून सुमारे ७५ कोटी रुपये देणाऱ्या देणगीदारांचा तपशील जाहीर केलेला नाही.