हैदराबादची ‘मालवाहतूक ट्रेन’ सुसाट; दिल्लीला पराभूत करून दुसऱ्या क्रमांकावर झेप

या विजयामुळे हैदराबादचा संघ १० गुणांनिशी पहिल्या क्रमांकावर पोहोचला

हैदराबादची ‘मालवाहतूक ट्रेन’ सुसाट; दिल्लीला पराभूत करून दुसऱ्या क्रमांकावर झेप

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर शनिवारी रंगलेल्या सामन्यात हैदराबादने दिल्लीचा ६७ धावांनी पराभव करून गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. आदल्या दिवशीच दिल्लीचे गोलंदाज प्रशिक्षक जेम्स होप्स यांनी हैदराबादला ‘मालवाहतूक रेल्वे’ म्हणत दिल्लीचे गोलंदाज त्यांना थोपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. हे संबोधन त्यांनी जणू सार्थ ठरवले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादची ही मालवाहतूक रेल्वे शनिवारीही सुसाट धावली.

ट्रॅव्हिस हेडने ३२ चेंडूंत फटकावलेल्या ८९ धावा आणि अभिषेक शर्माच्या १२ चेंडूंत ४६ धावांच्या जोरावर हैदराबादने २० षटकांत सात विकेट गमावून २६६ धावा केल्या. त्यांनी पॉवरप्लेमध्ये विक्रमी नाबाद १२५ धावांची भागीदारी केली. त्यामुळे ते आयपीएलमध्ये ३०० धावा करतील की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हैदराबादला प्रत्युत्तर देताना जेक फ्रेझर-मॅकगर्कने १८ चेंडूंत ६५ धावा करून दिल्लीच्या खेळात जीव ओतला.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरांना शिंदेकडून लोकसभेसाठी ऑफर?

राजस्थानमध्ये वऱ्हाडांच्या कारला अपघात, ९ जणांचा मृत्यू!

‘रेहान बीफ शॉप जिंदाबाद, कत्तल करत रहा’

गाडी अपघातात पंकज त्रिपाठी यांच्या मेहुण्याचा मृत्यू; बहीण जखमी!

अभिषेक पोरेलनेही २२ चेंडूंत ४२ धावा करून त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी अवघ्या पाच षटकांत तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. मात्र फ्रेझर-मॅकगर्क बाद झाल्यानंतर दिल्लीचा संघ कोलमडला आणि त्यांचा संपूर्ण संघ १९.१ षटकांत १९९ धावाच करू शकला.

टी नटराजन याने १९ धावा देऊन चार विकेट घेऊन हैदराबादच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयामुळे हैदराबादचा संघ १० गुणांनिशी दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यांच्यापुढे आता केवळ राजस्थान आहे. तर, दुसरीकडे ऋषभ पंतने ३५ चेंडूंत केलेल्या ४४ धावा हैदराबादने ठेवलेले २६६ धावांचे लक्ष्य गाठण्यात अपुऱ्या पडल्या. पृथ्वी शॉने दमदार सुरुवात केली खरी, मात्र वॉशिंग्टन सुंदरने त्याची विकेट घेतली. तर, फ्रेझर-मॅकगर्कने त्याचे अर्धशतक केवळ १५ चेंडूंत पूर्ण केले. मात्र त्याचे विजयात रूपांतर होऊ शकले नाही.

ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय अवसानघातकी ठरला. दिल्लीचे गोलंदाज हैदराबादच्या फलंदाजांपुढे निष्प्रभ ठरले. हेड आणि अभिषेकने त्यांच्या गोलंदाजांची पिसे काढली. कुलदीप यादवनेही चार विकेट घेतल्या तरी त्यासाठी त्याला ५५ धावा मोजाव्या लागल्या. हैदराबादच्या शाहबाझ अहमदने २९ चेंडूंत ५९ धावा करून हैदराबादची धावसंख्या २५०पुढे नेण्यात मोठे योगदान दिले.

Exit mobile version