इराणने रविवारी शेकडो ड्रोन, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि क्रूझ क्षेपणास्त्रे थेट आपल्या हद्दीतून इस्रायलवर सोडली. यामध्ये १७० ड्रोन, ३० पेक्षा जास्त क्रूझ क्षेपणास्त्रे आणि १२० पेक्षा जास्त बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे सोडण्यात आली. यामुळे तेथील हवाई तळाला किरकोळ नुकसान झाले. मात्र ही क्षेपणास्त्रे निकामी करणात अमेरिकेने इस्रायलला मदत केली. व्हाईट हाउसच्या म्हणण्यानुसार अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, अमेरिकेने इस्रायलला “जवळपास येणारे सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्रे निकामी करण्यास मदत केली आहे. इराणच्या हल्ल्यानंतर बायडेन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण झाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सीरियातील आपल्या दूतावासावर १ एप्रिल रोजी झालेल्या हवाई हल्ल्यापासून इराणने बदला घेण्याचे वचन दिले होते. यासाठी तेहरानने इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप केला होता. यावर इस्त्रायलने कोणतेही भाष्य केलेले नाही.
इस्त्राईल डिफेन्स फोर्सेसचे रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, इराणने १७० ड्रोन, ३० हून अधिक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि १२० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. त्यांनी असेही सांगितले की इस्रायलने इराणकडून ९९ टक्के प्रक्षेपण कमी केले आणि प्रति-संरक्षण एक अतिशय महत्त्वपूर्ण धोरणात्मक यश असे म्हटले आहे. इराणने या हल्ल्याची पुष्टी केली आणि त्याला “कायदेशीर संरक्षण” असे म्हटले आहे. इराणची लष्करी कारवाई दमास्कसमधील आमच्या राजनैतिक परिसरावर झिओनिस्ट राजवटीच्या आक्रमणाला प्रतिसाद म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या सनदातील कलम ५१ वर आधारित होती,असे इराणच्या संयुक्त राष्ट्रातील स्थायी मिशनने एका निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा..
भारतीय लष्करी जवानांची दुसरी तुकडी मालदीवमधून परतली!
काँग्रेसचे विशाल पाटील मविआ उमेदवाराविरोधात उभे राहणार!
न्याय संहिता, गरिबांना घरे, मोफत अन्न, नोकऱ्यांची हमी…. भाजपचा जाहीरनामा मोदींनी केला घोषित!
इराणचे संरक्षण मंत्री मोहम्मद रझा अशतियानी यांनी इशारा दिला की, इस्रायलकडून इराणवर हल्ले करण्यासाठी हवाई क्षेत्र किंवा प्रदेश उघडणाऱ्या कोणत्याही देशाला तेहरान ठामपणे उत्तर देईल, अशी बातमी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. इराणच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तेल अवीव येथील लष्करी मुख्यालयात इस्रायलच्या युद्ध मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. एका निवेदनात नेतन्याहू म्हणाले की, इस्रायलचे स्पष्ट तत्व आहे. जो कोणी आमचे नुकसान करेल, आम्ही त्यांचे नुकसान करू. आम्ही कोणत्याही धोक्यांपासून स्वतःचा बचाव करू आणि ते सर्व स्तरावर आणि दृढनिश्चयाने करू, असे इस्त्रायली पंतप्रधानांनी म्हटले आहे.
जो बायडेन यांनी इराणच्या हल्ल्यानंतर आपल्या सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी इस्रायलच्या विशेष क्षमतेचे कौतुक केले आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना सांगितले की त्यांनी आपल्या शत्रूंना स्पष्ट संदेश दिला की ते इस्रायलच्या सुरक्षेला प्रभावीपणे धोका देऊ शकत नाहीत.आपण इराणच्या हल्ल्यांचा शक्य तितक्या तीव्र शब्दात निषेध करतो आणि इस्रायलच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या बांधिलकीची स्पष्ट करतो.
इस्रायलच्या चॅनल १२ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटिश लष्करी विमानांनी इराक-सीरिया सीमा भागात काही इराणी ड्रोन पाडले. दरम्यान, यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी एक्स वर एक निवेदन जारी करून इराणच्या “इस्रायलवरील बेपर्वा हल्ल्याचा” तीव्र शब्दांत निषेध केला.यूके इस्रायलच्या सुरक्षेसाठी आणि जॉर्डन आणि इराकसह आमचे सर्व प्रादेशिक भागीदारांसाठी उभे राहील, असे सुनक यांनी म्हटले आहे.
अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, अर्जेंटिना आणि फ्रान्ससह इतर राष्ट्रांनी इराणच्या इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. भारताने तात्काळ तणाव कमी करण्याचे आणि संयम पाळण्याचे आवाहन केले आहे. रविवारी या परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक होणार असल्याने या प्रतिक्रिया आल्या आहेत.