‘अमेठी लोकसभा मतदारसंघातून न लढण्याचा राहुल गांधींचा निर्णय खूप कौतुकास्पद आहे. म्हणजे त्यांच्या मते, काँग्रेससाठी मी अत्यंत महत्वाची आहे,’ असे प्रत्युत्तर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी शुक्रवारी दिले.
‘काँग्रेस पक्षाचे असे म्हणणे की त्यांची संपूर्ण रणनीती आणि उर्जा माझ्यावर केंद्रित होती. ही माझ्यासाठी मोठी कौतुकास्पद बाब आहे. याचा अर्थ असा आहे की मी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे,’ असे त्यांनी इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना सांगितले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्या ट्वीटला उत्तर देताना स्मृती इराणी यांने हे वक्तव्य केले. ‘भाजप खासदार स्मृती इराणी यांची एकमेव ओळख म्हणजे त्या अमेठीतून राहुल गांधींविरुद्ध निवडणूक लढवतात. राहुल गांधींनी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवल्याचा निर्णय घेतल्याने इराणी यांची प्रासंगिकता संपली आहे. अर्थहीन विधाने करण्याऐवजी स्मृती इराणींना आता स्थानिक विकासाबाबत उत्तर द्यावे लागेल: बंद पडलेली रुग्णालये, स्टील प्लांट आणि आयआयआयटीबाबत त्यांना बोलावे लागेल,’ असे ट्वीट जयराम रमेश यांनी केले.
मात्र इराणी यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले. ‘काँग्रेसचा हा निर्णय इतिहासापेक्षा कमी नाही, कारण गांधी परिवाराने अमेठीचा तथाकथित बालेकिल्ला सोडला आहे. राहुल गांधी अमेठीतून पळून जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. सन २०१९मध्येही त्यांनी वायनाडमधून लढण्यासाठी अमेठी सोडले होते. आज अमेठी सोडून पराभवाची घोषणा करणे गांधी कुटुंबासाठी महत्त्वाचे आहे, कारण पंतप्रधानांनी नेमके हेच त्यांच्या संपूर्ण लोकसभा मुलाखतीदरम्यान सांगितले होते,’ असे इराणी म्हणाले.
हे ही वाचा:
ओडिशा: पुरी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराने सोडले मैदान, पक्षाकडे तिकीट केले परत!
तांत्रिक बिघाड झालेल्या सैन्य दलाच्या हेलीकॉप्टरचे शेतात इमर्जन्सी लँडिंग
नेपाळ १०० रुपयांच्या नोटांवर छापणार नवा नकाशा; भारताच्या तीन भागांचा समावेश
राहुल गांधी यांना रायबरेलीची लढतही सोपी जाणार नाही!
‘आज, काँग्रेसने, विशेषतः वायनाडच्या लोकांसमोर बोललेले खोटे उघड झाले आहे. मला वाटते की राहुल गांधींनी वायनाडच्या जनतेला निवडणुकीपूर्वी सांगायला हवे होते की, ते दुसऱ्या जागेवरूनही लढणार आहेत,’ अशी पुस्ती इराणी यांनी जोडली.स्मृती इराणींनी गेल्या पाच वर्षांत अमेठीसाठी काय केले, असे विचारले असता त्या म्हणाल्या, ‘मला वाटते की मी येथे काय केले, याचे उत्तर गांधी कुटुंबाने येथून पळून दिले आहे.
आम्हाला दोन वर्षे करोनासाथीचा सामना करावा लागला. उर्वरित तीन वर्षांत पंतप्रधान मोदींनी लोकांना एक लाख १४ हजार घरे मिळवून देण्यात मदत केली, चार लाख घरांना शौचालये दिली, साडेतीन लाख घरांना नळजोडणी दिली, दोन लाख २० हजार घरांना गॅस कनेक्शन दिले, दीड लाख कुटुंबांना वीज जोडणी मिळेल, याची खात्री केली,’ असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे निष्ठावंत केएल शर्मा यांनी अमेठी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, येथे २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. अमेठीचे तीन वेळा खासदार राहिलेले राहुल गांधी यांचा २०१९च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांच्याकडून ५५ हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने पराभव झाला होता. तेव्हा इराणी यांना ‘जायंट किलर’ असे संबोधले गेले होते.