पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. कुठेतरी असंवेदनशीलतेचा परिचय या घटनेतून पहायला मिळाला. यासंदर्भात एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे, जी संपूर्ण घटनेचा तपास करेल. तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून धर्मादाय रुग्णालयांवर कशाप्रकारे नियंत्रण करता येईल याबाबत ही समिती काम करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशा अभावी दाखल करून न घेतल्यामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. भाजपा, शिवसेना शिंदे, शिवसेना उबाठा आणि पतित पावन संघटनेकडून रूग्णालयाबाहेर आज निदर्शने करण्यात आली. डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी सर्व पक्षांकडून करण्यात आली.
या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली. संपूर्ण घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे अतिशय प्रतिष्ठित असे हॉस्पिटल आहे. लता मंगेशकर यांनी पुढाकार घेवून आणि मंगेशकर कुटुंबियांच्या सहकाऱ्याने हे हॉस्पिटल उभे केले.
ज्या प्रमाणे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी प्रसुतीला आलेल्या महिलेला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करुन घेण्यास नकार दिला किंवा अधिकचा पैसा मागितल्याचा विषय समोर आला. या संपूर्ण प्रकारामुळे लोकांमध्ये अतिशय चीड आहे. विशेषतः धर्मादाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे.
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री कक्षाने देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातले होते पण दुर्दैवाने रुग्णालयाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. अशा प्रकारच्या घटना घडे नयेत म्हणून कडक कारवाई करण्याचा आमचा मानस आहे.
रुग्णालय ताब्यात घेता येत नाही, भावना आणि कायदा यामध्ये फरक असतो. त्यामुळे धर्मादाय रुग्णालये सरकारला ताब्यात घेता येत नाहीत. पण त्यामध्ये काही अनियमितता असतील तर धर्मादाय आयुक्तांना अधिकार आहेत कि ते त्याच्या संदर्भात निर्णय घेवू शकतील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा :
Bigg Boss 18 : देशातील पहिल्या एआय सुपरस्टारचे बिग बॉस १८ मध्ये स्थान निश्चित!
भाजपा कार्यकर्त्याची आत्महत्या; चिठ्ठी लिहित काँग्रेस नेत्यांवर केले आरोप
मनोज कुमार : अभिनेता, दिग्दर्शक आणि होमिओपॅथीचा डॉक्टरही!
दरम्यान, भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी मोनाली भिसे यांना प्रसूती वेदना होत होत्या. यानंतर त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यावेळी त्यांच्याकडे १० लाखांची मागणी करण्यात आली.
सुशांत भिसे यांनी रुग्णालयाला विनंती करत उपचार करण्यास सांगितले. यासाठी ते अडीच लाख भरायला तयार होते. मात्र, रुग्णालयाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने नकार दिल्यामुळे अखेर मोनाली भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, यामध्ये त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा जीव गेला.
दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मोनाली भिसे यांचा दुर्दैवी अंत झाला. पण उपचारापूर्वी त्यांनी पिंपरी चिंचवडच्या वाकड इथल्या सूर्या हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्या मुलींना जन्म दिला. दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.