लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्यांची विविध वैशिष्ट्ये आपल्या भाषणात सांगितली. त्यावेळी लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीही त्यांनी भाष्य केले. टिळकांनी कसे सावरकरांना प्रोत्साहित केले, यावर मोदींनी भर दिला.
ते म्हणाले की, लोकमान्य टिळकांना हे ठाऊक होते की, स्वातंत्र्य चळवळ व राष्ट्रनिर्माण भविष्याची जबाबदारी युवकांच्या खांद्यावर असते. शिक्षित व सक्षम युवांचे निर्माण त्यांना करायचे होते. लोकमान्यांमध्ये युवकांमधील गुणवत्ता ओळखण्याची दिव्यदृष्टी होती. वीर सावरकरांशी संबंधित घटनेत हे दिसून येते. तेव्हा सावरकर तरुण होते. टिळकांनी सावरकरांमधील गुणवत्ता हेरली. परदेशात जाऊन त्यांनी शिक्षण घ्यावे आणि देशकार्य करावे असे त्यांना वाटत होते.
ब्रिटनमध्ये श्यामजीकृष्ण वर्मा अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत होते. छत्रपती शिवाजी महाराज स्कॉलरशिप, महाराणा प्रताप स्कॉलरशिप अशा त्या शिष्यवृत्ती असत. टिळकांनी सावरकरांची शिफारस केली आणि त्यातूनच ते परदेशात गेले. अनेक युवकांना त्यांनी तयार केले. न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज या संस्था त्यांच्या दूरदृष्टीची देणगी आहे. अनेक युवक या संस्थांमधून शिकले आणि राष्ट्रनिर्माणात योगदान दिले.
मोदी म्हणाले की, इंग्रज म्हणत भारतातील नागरीक देश चालवू शकत नाहीत तेव्हा लोकमान्य टिळकांनी स्वराज्य आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, असे ठणकावून सांगितले. भारताची आस्था, संस्कृती परंपरा हे मागास विचारांचे लक्षण आहे, असे इंग्रज म्हणत तेव्हा टिळकांनी त्यांना चुकीचे ठरविले. म्हणूनच भारताच्या जनमानसाने टिळकांना लोकमान्यता दिली. लोकमान्य हा किताबही दिला. टिळकांनी स्वातंत्र्याच्या आवाजाला बुलंद करण्यासाठी पत्रकारितेचे महत्त्व ओळखले. मराठा दैनिक सुरू केले. मराठीत गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यासह केसरी सुरू केला. १४० पेक्षा अधिक वर्षे केसरी छापला जातो. वाचला जातो. टिळकांनी मजबूत पायावर संस्था उभारल्या. संस्थांप्रमाणे लोकमान्य टिळकांनी परंपरांनाही जोपासले. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणेतून जनआंदोलन उभारण्यासाठी शिवजयंती उत्सवाचे आयोजन सुरू केले.
हे ही वाचा:
मुसेवाला हत्येचा कट रचणारा सचिन थापन पोलिसांच्या ताब्यात ! लवकरच भारतात आणणार
केरळचे सात पर्यटक इस्रायलमध्ये बेपत्ता; बेकायदा स्थलांतराचा संशय
लोकमान्य टिळकांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य!
पंतप्रधान मोदी बुलंद भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे काम करतायत
टिळकांचे गुजरातशी नाते
मोदींनी टिळकांचे गुजरातशीही नाते असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीत दीड महिना टिळक अहमदाबाद, साबरमती जेलमध्ये राहिले. १९१६मध्ये टिळक अहमदाबादला आले. त्या काळात इंग्रजांचे वर्चस्व असताना टिळकांच्या स्वागतासाठी, त्यांचे भाषण ऐकण्यासाठी ४० हजार लोक आले होते. त्यांना प्रेक्षकांत सरदार वल्लभभाई पटेलही होते. त्यांच्या भाषणाने सरदार पटेल यांच्या मनावर ठसा उमटविला. मग सरदार पटेल महापालिकेचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी अहमदबादमध्ये टिळकांचा पुतळा लावण्याचा निर्णय घेतला. व्हिक्टोरिया गार्डनमध्ये तो पुतळा बनविण्याचा निर्णय घेतला. इंग्रजांनी व्हिक्टोरिया राणीसाठी १८९७मध्ये हे गार्डन उभारले आले. या पार्कमधये त्यांच्या छातीवर पटेलांनी टिळकांचा पुतळा उभारायचे ठरविले. सरदार पटेलांवर दबाव आला पण ते लोहपुरुष होते. पण त्यांनी पद सोडण्याचा इशारा दिला पण पुतळा तिथेच लावला जाईल असे ठामपणे सांगितेल. १९२९ मध्ये त्याचे लोकार्पण महात्मा गांधींनी केले.
लोकमान्य टिळक गीतेवर निष्ठा ठेवत. गीतेतील कर्मयोगावर ते जगणारे होते. मंडाले तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले तेव्हा गीतेचे अध्ययन त्यांनी केले. गीतारहस्यच्या माध्यमातून कर्मयोगाची ताकद पोहोचविली.