१९ वर्षांखालील विश्वविजेत्या संघाचे प्रशिक्षक ते आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३मध्ये अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या संघाचे प्रशिक्षक असा ‘द वॉल’ म्हणून सर्वपरिचित असलेल्या राहुल द्रविड यांचा प्रवास राहिला आहे. आता त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारताचा संघ तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
द्रविड फॉर्मात असताना भारताच्या संघाला सन २००३मध्ये जोहान्सबर्ग येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. आता मात्र तो वेगळ्या भूमिकेत मैदानावर उतरणार आहे.
१९ वर्षांखालील नेतृत्वाचे कठीण दिवस
राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेअरडेविल्स या आयपीएल संघांचा मेन्टॉर म्हणून काम केल्यानंतर द्रविडने १९ वर्षांखालील युवा भारतीय संघ आणि सन २०१६मधील भारत अ संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारताचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता. मात्र वेस्ट इंडिजविरोधात संघाला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर दोन वर्षांनी नव्या खेळाडूंसह भारताने हाच विश्वचषक उंचावला. सन २०१८मध्ये झालेल्या या स्पर्धेत शुभमन गिल, पृथ्वी शॉ, रियान पराग, अभिषेक शर्मा आणि शिवम मावी होते. त्यानंतर बीसीसीएलने बेंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमी येथे क्रिकेट ऑपरेशन्सचे प्रमुख म्हणून द्रविड यांची नियुक्ती केली.
हे ही वाचा:
भारतीय अर्थव्यवस्थेने गाठला ४ दशलक्ष डॉलर्सचा टप्पा
म्हणे – “मुस्लीम दुय्यम नव्हे तर समान नागरिक !”
निवृत्त आयएएस अधिकाऱ्याकडून आयुष्यभराची संपत्ती राम मंदिराला दान
नूंहमधील हिंसाचार टळला; अल्पवयीनांनी केली होती दगडफेक
शास्त्रींकडून पदभार स्वीकारला
सन २०२१मध्ये राहुल द्रविड यांनी रवी शास्त्री यांच्याकडून भारतीय प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारली. त्यांनी गिल, श्रेयस अय्यर, इशान किशन आणि वॉशिंग्टन सुंदर यांसारख्या खेळाडूंना पाठिंबा दिला. सन २०२२मध्ये विराट कोहलीने सर्व प्रकारच्या भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर द्रविड यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी ती परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली आणि नवीन कर्णधार रोहित शर्मा याच्या सोबतीने संघावर मेहनत घेण्यास सुरुवात केली.
आयसीसी स्पर्धांमध्ये निराशाजनक कामगिरी
द्रविड यांची पहिली चाचणी झाली ती सन २०२२मध्ये ऑस्ट्रेलियात रंगलेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेच्या रूपात. भारताने स्पर्धेची सुरुवात चांगली केली आणि पाकिस्तानवर ऐतिहासिक विजयाची नोंदही केली. मात्र तरीही भारताचा संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरला. इंग्लंडने उपांत्य फेरीत भारताचा १० विकेटने पराभव केला. त्यानंतर भारताने जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामनाही गमावला. भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवले, मात्र लंडनमध्ये झालेला कसोटी विश्वचषक सामना भारताने गमावला.
आता मात्र द्रविड यांच्या मेहनतीची फळे सन २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत दिसू लागली आहेत. आतापर्यंतचे सर्व सामने भारताने जिंकले असून आता अंतिम सामनाही जिंकून भारत विश्वचषक उंचावेल, असा विश्वास भारतातील तमाम क्रिकेटप्रेमींना आहे.