लेहमध्ये ढगफुटी, पाऊस, चिखल;  पण पुन्हा उभी राहिली मराठमोळी ‘खानावळ’

महाराष्ट्रापासून दूर कुठेतरी मराठे झुंजले

लेहमध्ये ढगफुटी, पाऊस, चिखल;  पण पुन्हा उभी राहिली मराठमोळी ‘खानावळ’

मराठ्यांनी एकेकाळी अटकेपार झेंडे लावले. अजूनही मराठे अशा ‘मोहिमा’ राबवत असतात. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती हे अभिमानाने म्हणत ते संकटे, आव्हानांना भिडतात. लेहमध्ये ‘खानावळ’ हे एक मराठमोळे उपाहारगृह याचवर्षी उभे राहिले. पण दुर्दैवाने गेल्याच आठवड्यात ढगफुटी झाली आणि होत्याचे नव्हते झाले. पाणी, चिखलाचे साम्राज्य पसरले. मात्र या परिस्थितीत मागे हटेल तो मराठा कसला? कौस्तुभ दळवी, ग्रीष्मा सोले, प्रशांत ननावरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या परिस्थितीला समर्थपणे तोंड दिले. त्यांनी हा आव्हानांचा किल्ला कसा सर केला त्याची कहाणी ग्रीष्मा ‘न्यूज डंका’शी बोलताना सांगते तेव्हा आपल्याला त्यांचे कौतुक वाटते.

कौस्तुभ दळवी, ग्रीष्मा सोले, प्रशांत ननावरे यांच्यासह त्यांचे आणखी काही सहकारी अशी टीम खानावळ हे मराठमोळे रेस्टॉरन्ट लेहमध्ये चालवते. अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग. गेल्या आठवड्यात शुक्रवारी ढगफुटी झाली आणि रेस्टॉरन्टमध्ये चार फुटापर्यंत पाणी जमले. दोन फूट चिखल झाला. पण ते रडत बसले नाहीत. चिखल उपसला, पाणी काढण्यासाठी भिंती फोडाव्या लागल्या. अथकपणे तीन दिवस राबून त्यांनी हा परिसर स्वच्छ केला खरा पण नवे संकट उभे राहिले.

ग्रीष्मा सांगते की, आम्ही ही जी जागा रेस्टॉरन्टसाठी घेतली होती तिथे चौदा खोल्या होत्या. त्याच घराच्या गार्डनमध्ये आम्ही गार्डन रेस्टॉरन्ट चालवत होतो. लेह लडाखला फिरायला येणारे लोक तिथे रहायला येत होते. ते महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घेत असतं. पण ही इमारत ४०-५० वर्षे जुनी असल्यामुळे जेव्हा तिथे पाणी शिरले आणि सगळीकडे चिखल झाला तेव्हा ती अधिक धोकादायक बनली. तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन इथे राहू नका, धोका आहे असा इशारा दिला आणि मग आमच्यापुढे नवे आव्हान उभे राहिले. ग्रीष्मा सांगते की, मग आम्ही नव्या जागेच्या शोधात निघालो. तिथे लडाखी माणसे वगळता बाहेरच्यांना जागा विकत घेता येत नाही. त्यामुळे फक्त भाड्याने जागा घेणे हेच शक्य असते.

हे ही वाचा:

पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्याच्या साथीदारास रत्नागिरीतून अटक

राज्यात सॅटेलाईट कॅम्पसमुळे स्थानिक पातळीवर रोजगार मिळतील

पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्याच्या निशाण्यावर होते ‘छाबड हाऊस’

भारतीय शास्त्रज्ञांकडून हिमालयातील प्राचीन महासागराचा शोध

आम्हाला कल्पनाही नव्हती. शुक्रवारी अवघ्या अर्ध्या तासात सगळे चित्रच बदलून गेलं. रेस्टॉरन्ट आवरून आम्ही बसलेलो असताना वीजा कडाडू लागल्या. एरव्ही इथे विजा कडाडत नाहीत. त्यामुळे काहीतरी वेगळेच संकेत मिळू लागले. मग जोरदार पाऊस सुरू झाला आणि अर्ध्या तासात पाणी भरलं. ढगफुटी झाली होती. चार पाच फूट पाणी अर्ध्या तासात भरलं. २०१०मध्ये अशी ढगफुटी झाली होती आता १३ वर्षांनी ढगफुटी झाली. चिखल, पाणी यामुळे काही सुचेनासे झाले पण न थकता पहाटे चार वाजेपर्यंत चिखल काढण्याचं काम सुरू होतं. तीन चार दिवस हे साफसफाईचे काम चालले.

ग्रीष्माने सांगितले की, आमच्यापुढे समस्या होती ती की आम्ही ऑर्डर घेतलेली होती. तिही ३० जणांची. पावसाची कल्पना नव्हती. इथे फिरण्यासाठी महाराष्ट्रीयन पर्यटकांचे ग्रुप येतात. आता ही ऑर्डर पूर्ण करायची तर आम्ही जागा मिळविली. तिथे दोन दिवसात रेस्टॉरन्टचा सेटअप उभारला.  रंगरंगोटी केली. विक्रमी वेळेत सगळे केले आणि नंतर एकूण ऑर्डर आली ती ७५ जणांची. पण नेटाने किल्ला लढविला आणि सगळ्यांना पोटभर खाऊ घातले.

या सगळ्यांना कोणते पदार्थ खाऊ घातले याबद्दल ग्रीष्मा सांगते की, मी माझा नवरा कौस्तुभ दळवी इथे अनेक वर्षांपासून राहतोय पण मराठमोळ्या रेस्टॉरन्टच्या या उपक्रमात आता प्रशांत ननावरे आम्हाला जॉइन झालाय. आठ जण काम करतोय. त्यात झारखंडचे तरुणही आहेत. पण सगळे हळूहळू मराठी पदार्थ बनवत आहेत. या नव्या सेटमध्ये आलेल्या पर्यटकांना आम्ही पिठलं, मुगाची उसळ, पालक बटाट्याची भाजी, लोणचं, लसणाची चटणी, गुलाबजाम, आमटी भात असा मेन्यू दिला तर एका ग्रुपने दोन तास आधी ऑर्डर दिली. तरीही त्यांच्यासाठी पाटवडी रस्सा, अख्खा मसूर, पिठलं, थालीपीठं मठ्ठा, ताक असे पदार्थ दिले. वडापाव, मिसळही इथे आवडीने खातात. परदेशी लोकही येतात. त्यांना महाराष्ट्रीयन जेवण आवडतं. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा त्यांना विशेष आवडतो.

हा सगळा प्रसंग घडला त्याचे फोटो या सगळ्यांनी सोशल मीडियावर शेअर केले पण त्यात या संकटावर मात करतानाही चेहऱ्यावरचं हसू कमी झालं नाही. त्याबद्दल ग्रीष्मा म्हणते की, जे झालं ते आमच्या हातात नव्हतं. ज्या प्रकारे पाणी आलं ते पाहता आम्हाला हे साधं संकट नाही याची कल्पना आली. पण रडत बसून काहीही उपयोग नव्हता. हसत हसत संकटाचा सामना करू असे ठरवले आणि त्यावर मातही केली. अगदी कमी वेळेत लोकांसाठी आम्ही हे करू शकलो याचा आनंद आहे. महाराष्ट्रीयन कुझीन इन हिमालयाज ही खानावळची टॅगलाइन आहे. हिमालयाच्या खोऱ्यात सह्याद्री उठून दिसत आहे.

Exit mobile version