महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचा राजीनामा दिलेला असताना आणि राष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशनमधून गंभीर आरोपांमुळे निलंबन करण्यात आल्यानंतरही महाराष्ट्र बॉक्सिंगचे माजी अध्यक्ष जय कवळी हे महाराष्ट्र ऑलिम्पिक समितीच्या बैठकीला कोणत्या अधिकाराखाली उपस्थित राहतात, असा सवाल महाराष्ट्रातील खेळाडू व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची २६ जानेवारीला बैठक होते आहे. त्यात महाराष्ट्राची खेळातील प्रगती, खेळाडूंना कशी अधिकाधिक पदके मिळतील अशा विषयांवर चर्चा होणार आहे. या बैठकीत उपाध्यक्ष म्हणून जय कवळी उपस्थित राहणार असल्याचे कळते. त्यामुळे फेडरेशनच्या आदेशांचा विचार करता ते कोणत्या अधिकारात या बैठकीला उपस्थित राहतील, असा सवाल महाराष्ट्रातील बॉक्सर्स विचारत आहेत.
हे ही वाचा:
सदावर्तेना नागपूर, आरएसएस, फडणवीस यांच्याबद्दल विचारणा
“माईंड रीडर सुहानी शाह यांच्यापेक्षा मी करतो ते वेगळं आहे,
शिवाजी पार्क परिसर उद्या ‘नो-फ्लाय झोन’ घोषित
उर्फी म्हणते, कोणी घर देता का घर ..
राष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशनने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात जय कवळी यांच्यावर कारवाई करत त्यांचे निलंबन केले होते. कर्तव्यात कसूर, फेडरेशनच्या कार्यकारिणीची दिशाभूल करणे, फेडरेशनची अधिकृत कागदपत्रे, फाइल्स आणि रेकॉर्डस तसेच काही सामुग्री स्वतःकडे ठेवणे तसेच फेडरेशनचे सचिव म्हणून कार्यकाल संपुष्टात आलेला असतानाही समांतर बँक अकाऊंट सुरू ठेवणे या कारणास्तव त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करतानाच बॉक्सिंगमधील कोणत्याही उपक्रमात सहभागी होण्यापासून मनाई करण्यात आली होती. त्यामुळेच असा सवाल उपस्थित केला जात आहे की, बॉक्सिंगशी संबंधित कोणत्याही उपक्रमात सहभागी होता येणार नाही, असे आदेश फेडरेशननने दिलेले असतानाही जय कवळी हे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या बैठकीमध्ये कसे काय सहभागी होऊ शकतात? असा प्रश्न म्हणून विचारण्यात आला आहे.
१८ जानेवारीला जय कवळी यांनी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचा राजीनामा दिला. त्याआधी, गेल्यावर्षी राष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशनमधून त्यांना निलंबित करण्यात आले होते.
यासंदर्भात महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर यांना विचारणा करण्यात आली तेव्हा ते म्हणाले की, जय कवळी हे ऑलिम्पिक संघटनेत निवडून आले आहेत. त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ आहे. त्यामुळे भलेही ते महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेत नसतील किंवा राष्ट्रीय बॉक्सिंगमध्ये नसतील तरी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत ते कार्यरत राहू शकतात.
ऑलिम्पिक संघटनेच्या बैठकीला महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे दोन प्रतिनिधी येणारच आहेत. पण जय कवळी हे ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारिणीत असल्यामुळे तिथे ते उपस्थित राहू शकतात, असेही शिरगावकर यांनी सांगितले.
यासंदर्भात जय कवळी यांना संपर्क साधल्यावर ते म्हणाले की, मी महाराष्ट्र संघटनेचा राजीनामा दिला आहे पण मी ऑलिम्पिक संघटनेत निवडून आलो आहे. त्यामुळे माझा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत मी तिथे असेन. १२ वर्षे काम केल्यानंतर मी महाराष्ट्र बॉक्सिंगचा राजीनामा दिला आहे. मला पदाची लालसा नाही. आताही मी कोणतीही निवडणूक लढवत नाहीए. पण ऑलिम्पिक संघटनेत माझा कार्यकाळ आहे तोपर्यंत मी राहणार आहे.