23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषम्हणून जरांगेंनी फडणवीसांविरोधात तुतारी फुंकली की काय?

म्हणून जरांगेंनी फडणवीसांविरोधात तुतारी फुंकली की काय?

Google News Follow

Related

मनोज जरांगे गेले अनेक महिने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. पण रविवारी त्यांच्या आंदोलनाला वेगळीच कलाटणी मिळाली. जरांगे यांनी रविवारी आरक्षणासंदर्भात एकही शब्द न काढता फक्त आणि फक्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले.  त्यामागे कारण होते ते गेल्या दोन दिवसांत जरांगे यांच्यावर त्यांच्याच सहकाऱ्यांनी केलेले आरोप. अजय महाराज बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी जरांगे यांच्यावर घणाघाती आरोप केले. त्यात जरांगे हे पारदर्शक नाहीत, हेकेखोर आहेत या आरोपांपासून ते शरद पवार यांचाच या आंदोलनामागे हात आहे, जरांगे यांच्या डोक्यावर पवारांचा वरदहस्त आहे, अशा पद्धतीचे आरोप करण्यात आले. त्याला जरांगे यांनी एक पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले होते. पण रविवारी त्यांनी वेगळाच पवित्र घेत थेट फडणवीसांना लक्ष्य केले.

जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करण्यामागील कारण स्पष्ट होत नव्हते. कारण या आंदोलनादरम्यान फडणवीस आणि जरांगे यांची कधीही भेट झाली नाही, कधीही फडणवीसांनी जरांगे यांना कोणतीही आश्वासने दिली नाहीत,  तरीही अचानक फडणवीसांवर षडयंत्र केल्याचा आरोप जरांगे यांनी लावला. फडणवीस हे कसे आपल्यावरील सगळ्या आरोपांचे कर्ते करविते आहेत, ते आपल्याला विष पाजून मारणार आहेत, आपल्याला गोळ्या घालणार आहेत, असे आरोप जरांगे यांनी केले. त्यानंतर आपण फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाणार आहोत, त्याआधी आपण मेलोच तर आपले शव बंगल्यावर न्या, असेही त्यांनी सांगितले. हे सगळे फडणवीसांच्या बाबतीत ते बोलू लागल्यावर त्यामागे नेमके कोण आहे असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक होते.

ही भाषा जरांगे यांची कधीही नव्हती. याआधी सरकारवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ यांच्यावर ते टीका करत होते पण फडणवीसांवर षडयंत्राचा आरोप करतानाच त्यांनी कसे महाराष्ट्रातील राजकारण बदलले, एकनाथ शिंदे यांना कसे वेगळे केले, अजित पवार यांना कसे शरद पवारांपासून दूर केले एवढेच नव्हे तर एकनाथ खडसे यांनीही त्यांच्यामुळे कसा भाजपा हा पक्ष सोडला ही उदाहरणे जरांगे यांनी दिल्यानंतर त्यांच्या या वक्तव्यांत राजकारणाचा वास येऊ लागला.

देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे प्रमुख शत्रू बनल्यानंतर त्यांना सातत्याने लक्ष्य करणे हे या दोन्ही गटातील नेत्यांचे आद्यकर्तव्य बनले होते. रोज फडणवीसांवर आरोप करणे, महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून त्यांचा राजीनामा मागणे, अकेला देवेंद्र क्या करेगा हे सुप्रिया सुळे यांचे नेहमीचे वाक्य बनले होते. शिवाय, २०१९मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून लांब ठेवल्याचा आनंद या नव्याने बनलेल्या आघाडीला होता. यावरून जरांगेंच्या तोंडी असलेली भाषा ही त्यांची नसून महाविकास आघाडीची भाषा आहे की काय असा संशय व्यक्त केला गेला तर त्यात चुकीचे काहीही नव्हते.  काहीही करून फडणवीसांची बदनामी व्हावी आणि त्याद्वारे त्यांचे राजकारण संपुष्टात आणावे, मराठ्यांना त्यांच्याविरोधात उभे करून आपले राजकारण साधावे असे कुणाला वाटले आणि त्यासाठी जरांगेंचा उपयोग करून घेतला गेला तर ते शक्य होते. संगीता वानखेडे यांनी तर या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात आहे, असा खणखणीत आरोप केल्यानंतर तर जरांगे यांनी केलेल्या फडणवीसांवरील आरोपांचा अर्थही उलगडू लागला.

त्यामुळे जरांगे यांनी फडणवीसांविरोधात फुंकलेली तुतारी ही त्यांची नाही हे सांगण्यासाठी कुणा तज्ज्ञाची अजिबात गरज नव्हती.जरांगे यांनी एक महत्त्वाचा शब्द आपल्या या भाषणात वापरला होता तो म्हणजे फडणवीसांचा बामणी कावा. हा शब्द शरद पवारांच्या विचारधारेतला शब्द आहे. त्यांच्या नेत्यांकडून, समर्थकांकडून फडणवीसांबद्दल जातीय विधाने अनेकवेळा करण्यात आली आहेत. त्यामुळे जरांगे यांचे फडणवीसांना अंगावर घेण्याचे धाडस हे त्यांचे स्वतःचे नाही तर त्यांच्या पाठीशी कुणीतरी आहे जे हे भाषण त्यांच्याकडून करून घेत आहे, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांवर नेम धरत आहे, हे स्पष्ट झाले.

हे ही वाचा:

ठाकरे, शरद पवारांची स्क्रीप्ट जरांगे बोलत आहेत!

रांचीत टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर

२२ वर्षांपासून फरार असलेला दहशतवादी भुसावळ मध्ये सापडला!

२९ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित; दिल्लीच्या सीमा अंशतः खुल्या

मात्र या सगळ्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाला राजकारणाचा वास येऊ लागला. याआधीही तसा संशय घेतला जात होता, पण यावेळी ती खात्रीच जणू पटली. अशा परिस्थितीत जरांगे हे नेहमी वेगवेगळ्या मागण्या का करतात, आपल्या आंदोलनावर हटून का बसतात, याचे कारण कळले. हे आंदोलन करताना त्यासाठी आलेला अफाट खर्च कोण करतो, कोण महागड्या गाड्या जरांगे यांना पुरवतो, कोण सगळी सामुग्री उपलब्ध करून देतो, असे अनेक प्रश्नही उपस्थित झाले. जरांगे यांच्या हेकेखोर वर्तनामुळे आंदोलनाचे मात्र नुकसान झाले अशी चर्चा आता केली जाऊ लागली आहे. यातून नेमके काय साध्य झाले? केवळ राजकारण करण्याचाच हेतू यामागे आहे का, असा संशय जर व्यक्त होत असेल तर त्यात वावगे काय? फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक मोर्चे मराठ्यांनी काढले पण ते शांततेच्या मार्गाने चालले. यावेळी मात्र फडणवीसांनी मविआकडून सत्ता हिसकावून घेतल्यानंतर या आंदोलनाची दिशाच बदलली. मराठ्यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा कुणाचे तरी हिशेब यातून साधले जाणार असतील तर हे मराठ्यांचे मोठे दुर्दैव म्हणायला हवे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा