25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषअयोध्येतील श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा हा खऱ्या अर्थाने नूतन ऐतिहासिक क्षण

अयोध्येतील श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा हा खऱ्या अर्थाने नूतन ऐतिहासिक क्षण

आज एक राष्ट्र म्हणून आधुनिक भारत इतिहासाच्या एका संपूर्ण नव्या कालखंडात प्रवेश करत आहे.

Google News Follow

Related

श्रीकांत पटवर्धन

 

 

जगाच्या इतिहासाकडे अगदी ओझरती नजर टाकली, तरी एखाद्याच्या लक्षात येते, की जगभर, कुठेही – वेगवेगळ्या राष्ट्रांच्या धार्मिक, राजकीय जीवनात – एक अगदी विशिष्ट प्रकारचा साचा (Pattern) दिसतो. ऐतिहासिक सत्य हे आहे, की एकेश्वरवादी (Monotheistic) पंथांच्या उदयापूर्वी जगात सर्वत्र अनेकेश्वरवादी, वेगवेगळ्या देवदेवता पूजणारे धर्म / पंथ अस्तित्वात होते. अब्राहमिक किंवा एकेश्वरवादी पंथ उदयाला आल्यावर त्यांनी राजसत्ता काबीज केली, आणि पुढे तिच्या जोरावर त्यांनी पूर्वीचे अनेकेश्वरवादी पंथ, त्यांच्या सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे, पूजास्थाने, देवदेवतांच्या मूर्ती, यांसह नष्ट, नामशेष करून टाकले. हे करताना त्यांनी अनेकेश्वर वादी लोकांना, “सैतानाचे पूजक”, आणि त्यांच्या पूर्वीच्या संस्कृतींना “अज्ञानाचा काळा कुट्ट कालखंड” असे सरसकट, बिनदिक्कत ठरवून टाकले. युरोप आणि उत्तर आफ्रिकेच्या बऱ्याच मोठ्या भागात ख्रिश्चानिटीच्या उदयानंतर तिथल्या पूर्वीच्या ग्रीक, रोमन देवता पूजणारे लोक पागन (Pagan, अनेकेश्वरवादी) ठरवले गेले, नामशेष केले गेले. अनेकेश्वरवादी धर्मपंथांच्या प्रथा परंपरा बेकायदा ठरवल्या गेल्या, निषिद्ध मानण्यात आल्या. त्यांची मंदिरे पाडण्यात आली.

मक्केतल्या काबा येथील स्थानामध्येही इस्लामपूर्व अनेकेश्वरवादी पंथांची पूजास्थाने होती. दमास्कस येथील उमय्याद मशीद ही पूर्वीच्या एका ख्रिश्चन प्रार्थनास्थळावर बांधली होती आणि विशेष म्हणजे त्याच्याही पूर्वी तिथे ज्युपिटर या (ग्रीको रोमन) देवतेचे मंदिर होते. हेरत येथील भव्य मशीद आणि इस्फाहन येथील जामेह मशीद, या दोन्ही ठिकाणी झोरोस्ट्रीअन (पारसी) पंथाची अग्निमंदिरे होती. पण आता इस्लामपूर्व अनेकेश्वरवादी किंवा पारसी त्या भागात उरलेलेच नसल्याने , आणि मध्यपूर्वेत किंवा उत्तर आफ्रिकेत ख्रिश्चन नगण्य व राजकीय दृष्ट्या सत्ताविहीन असल्याने, धार्मिक प्रार्थनास्थळांतील ह्या बदलाविषयी कधी कोणाकडून आवाज उठवला जाण्याची अजिबात शक्यता नाही.

हे संघर्ष जगभरात अनेकेश्वरवादी विरुद्ध एकेश्वरवादी, किंवा काही ठिकाणी दोन विभिन्न एकेश्वरवादी पंथांमध्ये आपसात ही झालेले आहेत. (इस्लाम वि. ख्रिश्चानिटी) ह्याला अपवाद फक्त दक्षिण आशियाचा. मध्य आशियातून आलेल्या इस्लामी आक्रमकांनी भारतीय उपखंडाचे मोठमोठे भाग सपाट्याने काबीज केले, अनेक शतके आपल्या सत्तेखाली ठेवले आणि तिथे सक्तीची धर्मांतरे केली. ब्रिटीश सत्तेखाली असलेल्या पूर्वीच्या भारताचा मुस्लीम बहुल भाग आज पाकिस्तान म्हणून ओळखला जातो. (त्यातील पूर्वी पूर्वपाकिस्तान म्हणून असलेला भाग सध्या बांगलादेश आहे, तोही इस्लामी देशच आहे.)

पण भारताच्या बाबतीत मात्र एक आश्चर्यकारक गोष्ट घडली आहे. जगभरात आढळलेल्या एकेश्वरवादी पंथाच्या सर्वंकष विजयाच्या परंपरेला इथे जबर धक्का बसला, खीळ बसली आहे. ज्या इस्लामी आक्रमणापुढे जगभरातील मोठमोठी अनेकेश्वरपूजक राष्ट्रे त्यांच्या सगळ्या देवदेवतांसह, मंदिरांसह धुळीला मिळाली, नामशेष झाली, त्याच इस्लामी आक्रमणाला शतकानुशतके तोंड देत हिंदू धर्म जिवंत, शाबूत राहिला. त्यांना संपवण्याच्या सगळ्या अमानुष प्रयत्नांना हिंदू पुरून उरले. हिंदूंची महत्वाची मंदिरे, (रामजन्मभूमी, कृष्णजन्मभूमी, सोमनाथ, काशीविश्वनाथ, इ.) कैकवेळा पाडली गेली, मूर्ती फोडल्या, भ्रष्ट केल्या गेल्या. पण हिंदू त्यांची मंदिरे पुनःपुन्हा नव्याने बांधीत राहिले, सण उत्सव साजरे करत राहिले, आपल्या प्रथापरंपरा त्यांनी चिकाटीने जिवंत ठेवल्या. अनेकठिकाणी इस्लामी आक्रमकांनी मंदिरे पाडून त्यातून मिळालेल्या सामग्रीतूनच मशिदी उभ्या केल्या गेल्या, पण तरीही हिंदू नवी मंदिरे बांधत राहिले, पूजा अर्चना करीतच राहिले.

 

जर जगात इतरत्र मिळाले तसे सर्वंकष, निर्विवाद यश एकेश्वरवाद्यांना इथे भारतातही मिळाले असते तर आज अयोध्या, काशी, मथुरा इथल्या मंदिरांबाबत जे काही घडलेय, त्याबद्दल तक्रार करायला कोणी शिल्लकच राहिले नसते. सुदैवाने तसे झाले नाही. कैक शतके “अलाहाबाद” नाव सरकारदरबारी राहूनही कोट्यवधी लोकांच्या मनातून “प्रयाग” पुसले गेले नाही. सोमनाथ मंदिर कितीदा लुटले गेले, आणि कुठल्या पंथाच्या आक्रमकांनी लुटले, याची स्मृती कोट्यावधी जनमानसातून कधीही पुसली गेली नाही.

आज एक राष्ट्र म्हणून आधुनिक भारत इतिहासाच्या एका संपूर्ण नव्या कालखंडात प्रवेश करत आहे. अशा परिस्थितीत नेमके काय धोरण असावे, ते ठरवण्यासाठी आज आपल्यापुढे जगात कोणतेही उदाहरण नाही.
कारण या आधी कुठल्याही राष्ट्राने अशा प्रकारची परिस्थिती अनुभवलेलीच नाही. आपण पराभूत केलेल्या काफिरांना कुठल्याही प्रकारची दयामाया दाखवण्याची इस्लामची परंपरा नाही. उलट हिंदूंनी आजवरच्या इतिहासात एवढी एकजूट, एकात्मता कधीही दाखवलेली नाही, विजयाचा असा एकमुखी जल्लोष कधीही
अनुभवलेला नाही. शतकानुशतकांच्या संघर्षानंतर – (त्यामध्ये प्रत्यक्ष युद्धे, वैचारिक, कायदेशीर, न्यायालयीन लढाया, सर्व आले,) – हिंदूंचे परम आराध्य दैवत श्रीराम, अयोध्येत पूर्ण वैभवाने विराजमान होत आहे. यातून एक मोठी सामुहिक विजयाची भावना निर्माण होते. अशा भावनेचा अनुभव हिंदूंनी पूर्वी कैक वर्षात घेतलेला नाही. अशा निर्णायक विजयाची “सवय” लागू शकते. कारण इंग्रजीत म्हटल्याप्रमाणे,
“Nothing succeeds like success !”
काशीच्या ज्ञानवापी परिसरातील हिंदू मंदिराच्या खुणा अगदी उघड, स्पष्ट आहेत. मूळ शिवमंदिर औरंगझेबाच्या हुकमाने पाडले जाऊन, ग्यानवापी उभी केली गेली, याचे स्पष्ट पुरावे आहेत.

कृष्णजन्मभूमीची ही तीच अवस्था. आता, तथाकथित सौहार्द टिकवण्यासाठी इतिहास बदलायचा की इतिहास जसा आहे तसा (खरा) स्वीकारून, मध्ययुगीन आक्रमकांच्या अत्याचारांच्या खुणा तेवढ्या मिटवायच्या ते गांभीर्याने ठरवावे लागेल. आणि अंतिम विजय सत्याचाच होतो, हे आपण सर्व नेहमीच मानतो. त्यामुळे सत्याबाबत छेडछाड न करता, इतिहासकालीन चुकाच ठामपणे निस्तराव्या लागतील.

हे ही वाचा:

प्रभू रामांच्या काळ्या पाषाणाच्या मूर्तीनंतर पांढऱ्या रंगाच्या मूर्तीची पहिली झलक!

श्री रामभक्‍तांसाठी बनवलेल्या ‘हलवा’ची एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

मीरारोडमध्ये फडणवीसांनी बांबू दिला!

गडचिरोलीत नाव पालटून सहा महिला बुडाल्या

या संदर्भात, श्रीरामजन्मभूमी खटल्याच्या ९ नोव्हेंबर २०१९ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील एक अत्यंत महत्वाचे वाक्य आठवते. ते असे –
This Court in the excercise of its powers under Article 142 of the Constitution
must ensure that a wrong committed must be remedied. (Paragraph 800)
(या नंतर पुढे कोर्ट ६ डिसेंबर १९९२ ला जो विवादित ढांचा पाडला गेला, त्याचा उल्लेख करून त्याबद्दल मुस्लिमांना नुकसान भरपाई म्हणून अयोध्येत पाच एकर जमीन मशिदीसाठी देण्याचे आदेश आपल्या अनुच्छेद १४२ नुसार खास अधिकारात देते.) सर्वोच्च न्यायालयाचे हे शब्द नीट ध्यानात घ्यावे लागतील.
A wrong committed must be remedied. !!!
हे जर असे आहे, तर ……………………
तर अकराव्या बाराव्या शतकापासून मुस्लीम आक्रमकांनी या देशातील हिंदूंची असंख्य – सुमारे ४०००० – मंदिरे पाडली, त्याचे काय ? Were those things not wrong ??

हिंदूंच्या बाबतीत या देशात परकीय आक्रमकांकडून शतकानुशतके जो अन्याय केला गेलाय, तो अन्यायच आहे, ही स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल. जर हे सगळे भयंकर गुन्हे होते, तर मग प्रश्न हा, की –
Who will remedy these wrongs done to the Hindus ?? and When ??
६ डिसेंबर च्या एका, फक्त एका, जनक्षोभाच्या , उद्रेकाच्या , अपवादात्मक घटनेमध्ये मुस्लीम समाजाचे जे कथित नुकसान झाले, त्याविषयी मात्र – A wrong committed must be remedied. !!! अशी प्रखर न्यायवादी भूमिका सर्वोच्च न्यायालय घेते आणि हिंदूंच्या बाबतीत मात्र त्याच्या कैक पटीने अधिक भयंकर अन्याय, अत्याचार कैक शतके झालेले असून, हिंदूंनी त्याविरुद्ध ब्र ही काढू नये ही अपेक्षा ? देशातल्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची किंचितही दखल घेऊ नये? हे पूर्णपणे असमर्थनीय आहे. मध्ययुगीन आक्रमकांच्या चुका निस्तराव्या च लागतील, ही कणखर भूमिका हिंदूंना घ्यावी लागेल. अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे ते बळ, तो आत्मविश्वास हिंदूंना मिळो, हीच श्रीरामरायाकडे प्रार्थना. जय श्रीराम.
(लेखातील जागतिक इतिहासासंबंधी काही संदर्भांसाठी श्री अमित मजमुदार, या अमेरिकन ग्रंथकाराचे आभार)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा