वय वर्ष अवघे चार… तेव्हा नोव्हाक जोकोव्हिच याने पहिल्यांदा टेनिसचे रॅकेट हाती घेतले होते. तेव्हा त्याच्या सर्बियन आईवडिलांना अनेकांनी अनाहूत सल्ला दिला… ‘तो हे साध्य करू शकणार नाही.’ पण ना त्याचे आईवडील थांबले ना स्वत: नोव्हाक जोकोव्हिच. अविरत मेहनत, चिकाटी त्याने सोडली नाही आणि आता हाच नोव्हाक टेनिस जगतातील अनभिषिक्त सम्राट झाला आहे. जगातील अव्वल दोन टेनिसपटूंना मागे टाकून सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला पुरुष टेनिसपटू ठरला आहे.
रविवारी, ११ जून रोजी नोव्हाक जोकोविच याने पॅरिसच्या लाल मातीवर ही अविश्वनीय कामगिरी केली. सर्बियाच्या या ३६ वर्षीय टेनिसपटूने आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन करत कारकिर्दीतील तिसरे फ्रेंच ओपन तर विक्रमी २३वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले.
‘मी सर्बिया, या छोट्या देशातून आलो आहे. अनेकदा कित्येकजण मला आणि माझ्या आईवडिलांना मी या पाश्चिमात्य खेळामध्ये, पाश्चिमात्य देशांत सर्वाधिक खेळल्या जाणाऱ्या या खेळात चांगली कामगिरी करू शकणार नाही, असे सांगत. हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि तितकाच महागडा खेळ आहे,’ अशी आठवण विजेतेपद पटकावल्यानंतर जोकोव्हिच याने करून दिली.
सन २०१० सरत असतानाच पुरुष टेनिसपटूंमध्ये जणू केवळ दोघांचीच मक्तेदारी होती. रॉजर फेडरर या टेनिसपटूच्या खात्यात १६ ग्रँडस्लॅम जमा झाले होते. पीट सॅम्प्रसपेक्षा दोन ग्रँडस्लॅम अधिक. तेव्हा हा विक्रम अबाधित राहील, असेच वाटत होते. मात्र तेव्हाच राफाएल नदालची आगेकूच सुरू होती. त्या वर्षी नदालने तीन ग्रँडस्लॅमवर नाव कोरून एकूण नऊ ग्रँडस्लॅमची कमाई केली होती. डावखुरा नदाल हा पॅरिसच्या लाल मातीचा अनभिषिक्त सम्राट मानला जात होता. त्याने २५ वर्षे पूर्ण करण्याआधीच फ्रेंच ओपनची पाच विजेतेपदे पटकावली होती.
हे ही वाचा:
मालेगावात करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली धर्म परिवर्तनाचे धडे देण्याचा प्रयत्न
इंडिगो एअरलाइन्सचे विमान भरकटून पाकिस्तानमध्ये पोहचले
ऑस्ट्रेलियाने जिंकले पहिले कसोटी अजिंक्यपद
‘संस्कारी, देशप्रेमी, सुदृढ बाळ हवंय, मग रामायण वाचा’
अशा परिस्थितीत कुटुंबात टेनिसची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आणि त्याच्या देशालाही टेनिस ग्रँडस्लॅमचा इतिहास नसताना जोकोव्हिचने टेनिसचे स्वप्न पाहिले, जे त्याच्या देशातील प्रत्येक नागरिकासाठी दिवास्वप्नच होते. सन २००७मध्ये अमेरिकी ओपनच्या अंतिम सामन्यात जोकोव्हिचला रॉजर फेडररकडून सरळ तीन सेटमध्ये पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्याने त्याची भरपाई काही महिन्यांतच झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून केली आणि स्वत:चे ग्रँडस्लॅमचे खाते उघडले. मात्र पुढचे ग्रँडस्लॅम मिळवायला त्याला तीन वर्षे लागली. त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही.
कारकिर्दीच्या अत्युच्च शिखरावर पोहोचतानाही तो फेडरर आणि नदालचे कौतुक करताना थकत नाही. ‘मी नेहमीच माझी तुलना त्यांच्याशी केली. माझे हे कट्टर प्रतिस्पर्धी महान खेळाडू आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी मी काय करू शकतो, याचा मी तासन् तास विचार केला आहे. त्यामुळेच मी हे यश मिळवू शकलो,’ असे जोकोव्हिच म्हणाला. या वर्षी जोकोव्हिचने कॅलेंडरस्लॅम पूर्ण केल्यास तो अविश्वसनीय असा महान खेळाडू होण्याच्या समीप पोहोचेल.