चंद्रावर कसं उतरलं प्रज्ञान रोव्हर?

इस्रोने पोस्ट केला ‘चांद्रयान- ३’ चा व्हिडिओ

चंद्रावर कसं उतरलं प्रज्ञान रोव्हर?

चांद्रयान- ३ बाबत एक नवी माहिती समोर आली आहे. प्रज्ञान रोव्हर हे चंद्रावर कशा प्रकारे उतरलं, याचा व्हिडिओ आता इस्रोने शेअर केला आहे. विक्रम लँडरमधील लँडर मॉड्यूल कॅमेऱ्याने काढलेला हा व्हिडिओ आहे. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी ‘चांद्रयान- ३’ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग केले होते.

‘चांद्रयान- ३’ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर काही तासांनी त्यातून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडले होते. दरम्यान, गुरुवार, २४ ऑगस्ट रोजी रात्री इस्रोने हा व्हिडिओ पोस्ट केला. इस्रोने विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आला, त्या क्षणाचा व्हिडिओ पोस्ट केला.

चांद्रयान- ३ मोहीम यशस्वीपणे फत्ते करून भारताने नवा इतिहास रचला आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिलाच देश ठरण्याचा विक्रम भारताच्या नावे झाला आहे. चांद्रयान- ३ हे चंद्रावर १४ दिवस विविध प्रकारचे संशोधन करणार आहे.

चंद्रावर पाणी आहे का? पाण्याचे काही अंश आढळतात का? याचा अभ्यास केला जाणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मोठमोठे डोंगर-खड्डे असून या भागात सूर्याची किरणे तिरपी पडतात. त्यामुळे बहुतांश भागामध्ये अंधार असतो. यातील अनेक खड्डे अब्जावधी वर्षापासून अंधारात आहेत. कायम अंधार असल्यामुळे हा भाग प्रचंड थंड आहे. शिबाय दुर्लक्षितही आहे. -२०३ डिग्री सेल्सियस इतकं इथलं तापमान आहे. या भागात पाणी आणि खनिज सापडण्याची शक्यता अधिक आहे. खगोलीय संशोधनाच्या दृष्टीने हा भाग महत्वाचा आहे. त्याचमुळे दक्षिण धृवावर पोहचण्यासाठी अनेक देशांमध्ये स्पर्धा सुरू होती.

हे ही वाचा:

इस्रोचे पुढील लक्ष्य ‘आदित्य -एल १’

‘इंडिया’ आघाडी भाजपला पराभूत करेल?

शरद पवार, सुप्रिया सुळे लवकरच मोदी सरकारला पाठिंबा देतील

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक; २० मिनिटांसाठी होते तुरुंगात

चांद्रयान- ३ ने १४ जुलै २०२३ या दिवशी आपल्या चंद्राकडे जाणाऱ्या प्रवासाला सुरुवात केली होती. आंध्रप्रदेशातील श्री हरिकोटा येथून यानाने यशस्वी उड्डाण केले होते. भारताचे चांद्रयान- ३ हे कमी खर्चात चंद्रावर पोहचले. यासाठी इस्रोने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर केला. या प्रक्रियेत इंधनाची बचत होते, मात्र त्यासाठी जास्त वेळ लागतो.

रशियाची लुना- २५ ही मोहीम अयशस्वी झाल्यानंतर भारताच्या चांद्रयान- ३ कडे साऱ्या जगाचे लक्ष होते. अखेर भारताच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेला यश आले आहे. ही मोहीम पार पडत असताना अनेक यशस्वी टप्पे यानाने पार पाडले.

Exit mobile version