24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषऔरंगजेब झाला बद 'सुरत' (भाग ७)

औरंगजेब झाला बद ‘सुरत’ (भाग ७)

आपला शत्रु कळला की मग आपल्या पूर्वजांचं कर्तृत्व अधिक लक्षात येतं. त्यामुळेच मराठ्यांचे तीन छत्रपती ज्या औरंगजेबाशी झुंजले त्याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा हा प्रयत्न! औरंगजेब जगासमोर बदसुरत कसा झाला आणि खुद्द इराणच्या बादशाहाने त्याचा माज कसा उतरवला जाणून घेऊ या भागात.....

Google News Follow

Related

बोटे तुटलेला शाईस्तेखान चरफडत बंगालकडे निघून गेला. त्याच्या जागी दख्खनमध्ये कोणीतरी तोलामोलाचा अधिकारी पाठविणे गरजेचे होते. औरंगजेबाने वीस वर्षांचा राजपुत्र मुअज्जम उर्फ शाह आलमची नेमणूक करून त्याला औरंगाबादला पाठवले. मुअज्जम औरंगाबादला येऊन नुकताच स्थिर होत असतानाच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात औरंगाबादला एक भयंकर बातमी येऊन थडकली. काफर सीवा भरपूर फौज घेऊन औरंगाबादवर आक्रमण करणार आहे. हे ऐकून मुघलांचे धाबे दणाणले. जिभा टाळ्याला चिकटल्या. मुअज्जमने लढाईची तयारी सुरु केली. अफझलखान वध, पन्हाळा वेढ्यातून सुटका, शाइस्तेखान हल्ला यामुळे मोंगल – आदिलशाही आणि परदेशी लोकांत शिवाजी महाराजांना चेटूक येते. एकाच वेळी ते अनेक ठिकाणी असतात वगैरे वदंता पसरत होत्या.

वास्तविक झाले होते असे की महाराज पाच हजारांच्या फौजेसह अचानक त्र्यंबकेश्वरला पोहोचले आणि तिथे यथासांग पूजा करून एका प्रहरात आले होते तसे निघून गेले. कुठे गेले? कुठे गेले? कोणीतरी कुजबुजलं “औरंगाबादकडे”. औरंगाबाद! प्रत्यक्ष आलामगिराच्या नावाचे शहर. दख्खनमधले मुख्य ठाणे. औरंगजेबाच्या काळजाचा तुकडा. मुघलांचे नाक असलेले संपन्न शहर. शिवाजी महाराज तिथे जाणार अशी आवई उठली आणि वाऱ्याच्या वेगाने औरंगाबादला पोहोचली. युद्धाची सिद्धता करून मराठे आज येतील – उद्या येतील – परवा येतील म्हणून मुअज्जम तलवारीला धार काढत बसला. पण मराठे काही यायचे नावाचं घेईनात. तो पण कंटाळला बिचारा. त्याने समजूत करून घेतली कि शिवाजीराजे आणि मराठे घाबरले आणि मागे फिरले. खरं होतं ते मराठे त्र्यंबकेश्वरकडून औरंगाबादकडे गेलेच नाहीत … ते गेले सुरतेच्या दिशेने.

मागील भागांसाठी क्लिक करा:

१. आलमगीर औरंगजेब: मराठे ज्याला पुरून उरले (भाग १)

२. दख्खनेत कसा आला हिंदूद्वेष्टा औरंगजेब (भाग २)

३. औरंगजेबाची दक्खन कामगिरी (भाग ३)

सुरत – मुघल साम्राज्याला चार पिढ्या भरपूर महसूल देणारे गुजरात सुभ्यातील अतिश्रीमंत शहर. इथून आफ्रिका, युरोपपर्यंत व्यापार होई. मक्केला जाण्यासाठी इथूनच जहाजे निघत. एकटी सुरत १२ लाखांची केवळ जकातच देत असे. इतर उलाढाल वेगळीच! ५ जानेवारी १६६४ शिवाजी महाराज सुरत शहराच्या सीमेवर उधन्यापाशी पोहोचले आणि सुरत शहरात हाहाकार उडाला. यावेळी सुरत शहराच्या रक्षणाची जबाबदारी होती इनायतखानावर. त्याला या गोष्टीवर विश्वासच बसला नाही. कुठे पुणे? कुठे सुरत? त्याला कोणीतरी येऊन बातमी दिली कि शिवाजीराजे वगैरे नसून मुघलांचाच कोणीतरी सरदार आहे. इनायतखानाने आपला स्वार पाठवला – “ताबडतोब इथून निघून जा, जर हजरत जिल्ले इलाहींना हा प्रकार समजला तर त्यांच्या संतापाला सीमा उरणार नाही”. त्यावेळी औरंगजेब काश्मीरवरून परस्पर लाहोरला जाऊन बसला होता. महाराजांनी त्या स्वाराला अटक केली आणि महाराजांनी आपला वकील शहरात पाठवून मागणी केली. शहरातील प्रतिष्ठित मंडळींसह येऊन इनायतखानाने भेट घ्यावी आणि आम्ही सांगतो ती खंडणी द्यावी अन्यथा परिणामांना तयार रहावे.

मागील भागांसाठी क्लिक करा:

४. औरंगजेबाची सत्तेकडे वाटचाल (भाग ४)

५. औरंगजेब दिल्लीची सत्ता बळकावतो (भाग ५)

६. औरंगजेबाची मराठ्यांवरील पहिली शाही स्वारी- शाईस्ताखान (भाग ६)

इनायातखानाची धुंदी एका फटक्यात उतरली. घाबरून त्याने लाच देणाऱ्या लोकांना शहराच्या एका बाजूला बांधलेल्या किल्ल्यात घेतले आणि दरवाजा लावून घेतला. बाकी सुरत शहर मराठ्यांच्या तडाख्यात सापडले. शाईस्तेखानाने तीन वर्ष स्वराज्याची केलेली नासाडी आता सुरत भरून देणार होती. महाराजांच्या हेरांनी सुरतेची खडानखडा माहिती गोळा केली होती. चार दिवसात मराठ्यांनी सुरत एकदम बदसुरत करून टाकली. तिसऱ्या दिवशी चिडून इनायतखानाने वकिलाच्या वेषात एक मारेकरी पाठवला. बोलण्याच्या निमित्ताने त्याने जवळ जाऊन महाराजांवर कट्यारीने वार करण्याचा प्रयत्न केला. महाराजांचे अंगरक्षक इतके सावध होते की त्याने ज्या आकस्मिक वेगाने कट्यार बाहेर काढून हात वर नेला त्याच वेगाने त्याचा हात हवेतच कलम झाला. त्यावर अंगरक्षकांनी अजून वार करून अक्षरशः त्याचे तुकडे केले. आता महाराज संतापले आणि मराठे पिसाळले. आमच्या राजावर मारेकरी घालता?? त्यांच्यात आग्यावेताळ संचारला. संपूर्ण शहरात मराठे आणि आग याचे तांडव सुरु झाले. इनायातखानच्या दगाबाजीने संतापलेल्या मराठ्यांनी तीन हजार घरे आगीच्या तोंडी दिली. महाराजांच्या समोर सोने, चांदी, रत्ने, मोती, कापड, मसाले वगैरे किमती वस्तूंचे ढीग लागले. मात्र या छाप्यात स्त्रिया, मुले, बैरागी, फकीर, कुठलीही धर्मस्थळे किंवा शरण आलेल्यांना कणभरही तोशीस लागली नाही. पाच दिवस सुरत संपूर्ण नागवून महाराज पुन्हा त्र्यंबकेश्वरकडे निघाले. १८ जानेवारीला औरंगजेबाला ही बातमी समजली. सुरतच्या आगीची धग त्याचे काळीज जाळू लागली. सहा महिन्यात त्या पहाडी बंडखोरांनी मुघली सल्तनतीचा नक्षा दोनदा उतरवला. औरंगजेबाच्या डोक्यात या काफराचा कायमचा नाश करण्याची सणक आली. त्याने मुअज्जमला एक खरमरीत पत्र लिहून शिवाजीराजांचा बंदोबस्त कर अशी ताकीद दिली.

शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची बातमी पार पर्शियापर्यंत पोहोचली होती. औरंगजेबाने पर्शिया, बाल्ख, बुखारा, उरगंज, कॉन्स्टँटिनोपल वगैरे ठिकाणी आपले वकील मुघल राजदूत म्हणून पाठवले होते. तर्बीयतखान म्हणून वकील पर्शियात इस्फाहान इथे वर्षभर राहिला. त्यावेळी शहा अब्बास दुसरा तिथे बादशहा म्हणून राज्य करीत होता. त्याने तर्बीयतखानसमोर अनेकदा मुघलांची यथेच्छ चेष्टा चालवली. औरंगजेबाचा खापरपणजोबा म्हणजे हुमायून याला माझ्या पूर्वजांनी सिंहासनावर बसविले होते. त्यामुळे मुघलांवरती आम्ही उपकार केले आहेत याची पावलोपावती आठवण करून देण्यात येत होती. शाह अब्बास हा शिया पंथीय होता त्यामुळे सुन्नी पंथाचा कट्टर अनुयायी असलेल्या औरंगजेबाच्या दृष्टीने तो देखील “काफर” होता. मात्र गंमत म्हणजे मुघलांचे बहुतेक आचार-विचार, परंपरा, दरबारी चालीरीती वगैरे सगळ्या पर्शियन संस्कृतीतून उचलेल्या होत्या. तर्बीयतखानाने त्याला औरंगजेबाचा एक शिक्का असलेले पत्र दिले – “सिक्का जद दर जहाँ चुं बद्र मुनीर, शाह औरंगजेब – आलमगीर” (जगज्जेता औरंगजेब याने सूर्यचंद्राप्रमाणे अढळ असा शिक्का उमटवला आहे) ते वाचून शाह अब्बास अत्यंत कुत्सितपणे हसला आणि म्हणाला औरंगजेबाचा शिक्का – “सिक्का जद ब कुर्से – पनीर, औरंगजेब-बरादर-कुश-ए-पीदरगीर” (आपल्या भावाला मारणारा आणि बापाला कैद करणारा औरंगजेब पनीरच्या गोळ्यावर शिक्का मारत आहे) असा हवा.

वर्षभराने तर्बीयतखानाला निरोप देताना शाह अब्बासने तर्बीयतखानसोबत औरंगजेबाला एक पत्र पाठविले त्यात तो म्हणतो – “हिंदुस्थानातील अनेक जमीनदार तुमच्याविरुद्ध बंद करून उठल्याची बातमी मला मिळाली. त्यांचा मुख्य नेता नापाक सीवा जो कुणाला माहीतही नव्हता त्याने तुमचे किल्ले बळकावले, शिपाई ठार मारले बराच प्रदेश बळकावला आहे. याचे कारण तुम्ही दुबळे आणि नाकर्ते आहात. तुम्ही स्वतःला “आलमगीर” म्हणवता पण तुम्ही केवळ वडिलांना जिंकणारे (पीदरगीर) आणि भावांना मारणारे आहात. हे सर्व थांबविण्यासाठी बहुदा मलाच मोठे सैन्य घेऊन यावे लागेल असे दिसते.” वरून शाह अब्बासने औरंगजेबाला चाळीस अत्यंत उमदे इराणी घोडे भेट म्हणून पाठविले आणि सांगितले “माझ्यावर चाल करून येण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे घोडदळ नाही असे म्हणू नये म्हणून मी हे घोडे औरंगजेबाला पाठवीत आहे. तो माझ्यावर चाल करून आला कि जगज्जेता म्हणजे काय असतो याचा पाठ शिकवीन.” अर्थात यामुळे औरंगजेबाचे रक्त खवळले. त्याने सगळा राग तर्बीयतखानावर काढला आणि म्हणाला “तू आपल्या बादशहाची नाचक्की ऐकून परत येण्यापेक्षा तिथेच मेला का नाहीस?” त्याने तर्बीयतखानाची मनसब कमी केली व त्याला दरबारात येण्यास मनाई केली. सध्यातरी औरंगजेबाकडे करण्यासारखे इतकेच होते. औरंगजेबाच्या डोक्यात शिवाजी महाराजांवर सूड घेणे हा एकच विचार घोळत होता. त्यासाठी त्याने आपल्याकडचा अजून एक मोहरा पटावर उतरवला त्याला “मिर्झा” म्हणजे राजपुत्र अशी पदवी बहाल केली आणि मोठ्या मानाची सप्तहजारी मनसब दिली. आता एका “काफरावर” त्याने दुसरा “काफर” पाठवायचे निश्चित केले “मिर्झा राजा जयसिंग”.

(क्रमशः)

संदर्भ –

१) हिस्टरी ऑफ औरंगजेब- सर जदुनाथ सरकार

२) सिंध इन मुघल एम्पायर- अमित पालीवाल

३) मुसलमानी  रियासत भाग २ – रियासतकार सरदेसाई

४) स्टोरिआ दो मोंगोर- निकोलाओ मनुची

५) शककर्ते शिवराय

६) राजा शिवछत्रपती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा