अमूलच्या उत्पादनांवरील निळे केस, ठिपक्यांचा फ्रॉक, गुलाबी गाल असलेली मुलगी कुणीच विसरू शकत नाही. अजूनही अमूल बटरच्या जाहिरातीतील ती मुलगी त्या उत्पादनाची एक ओळख बनून गेली आहे. या अमूल गर्लचे निर्माते सिल्व्हेस्टर डाकुन्हा यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने ही अमूल गर्ल पोरकी झाली आहे.
१९६६मध्ये ही जाहिरात सर्वप्रथम प्रसिद्ध झाली. ही कलाकृती साकारली होती डाकुन्हा यांनी. ते एएसपी या जाहिरात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते आणि त्यांचे कला दिग्दर्शक होते युस्टास फर्नांडिस. अमूलचे डॉ. वर्गीस कुरियन यांनी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले होते.
डाकुन्हा यांच्या चरित्रविषयक पुस्तकात म्हटले आहे की, अमूलच्या इंडिया ३.० या जाहिरातीसाठी एक शुभंकर (मॅस्कॉट) हवा होता. महिला आणि मुलांच्या पसंतीस उतरेल अशा शुभंकराची निर्मिती त्यांना करायची होती. मग त्यांनी निर्णय घेतला की, या ब्रँडसाठी एका लहान मुलाचा चेहरा वापरता येईल. डाकुन्हा यांनी आपल्या डोक्यातील कल्पना आपले मित्र फर्नांडिस यांना सांगितली. फर्नांडिस यांनी मग ही अमूल गर्ल चितारली. अमूलच्या त्या जाहिरातीसाठी अटर्ली बटर्ली डिलिशस हे शब्द स्फुरले ते डाकुन्हा यांच्या पत्नी निशा डाकुन्हा यांना.
तेव्हा मुंबईतील दिव्यांच्या खांबावर या उत्पादनांची जाहिरात लावली जात असे. ही अमूल गर्ल देवाकडे प्रार्थना करते आहे, मला आजच्या दिवशी अमूल बटरसंगे माझे जेवण मिळू दे. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांचाही अमूलच्या उत्पादनांशी संबंध आहे. त्यांच्या भगिनी शोभा आणि स्मिता या अमूलमधील अमूल गर्ल म्हणून प्रथम प्रसिद्ध झाल्या होत्या.
हे ही वाचा:
मणिपूर संघर्षावर २४ जून रोजी सर्वपक्षीय बैठक
समान नागरी कायदा आणण्यात मुख्य अडथळे कोणते?
पाटण्यातील बैठकीपूर्वी विरोधकांना दणका, एचएएमचे जीतन राम मांझींचा भाजपाला पाठींबा
दर्शना पवारची हत्या करणाऱ्या राहुल हंडोरेला अटक, हत्येचे कारण स्पष्ट
त्यांच्या निधनासंदर्भात अमूल इंडियाचे मार्केटिंग महाव्यवस्थापक पवन सिंह म्हणाले की, डाकुन्हा यांनी आपल्याला एकदा सांगितले होते की, त्यांनी अमूल गर्लप्रमाणे अमूल चीज बॉयदेखील त्यांनी तयार केला आहे. ९०च्या दशकाच्या अखेरीस त्यांनी तसा चीज बॉय तयार केल्याचे सांगताना माझ्यासारखी प्रतिमा त्यांच्या डोळ्यासमोर होती असे ते म्हणाले होते. अर्थात, अमूल चीजच्या निर्मितीत माझ्या योगदानाची दखल घेण्यासाठी त्यांनी हे केलेले माझे कौतुक होते. त्यांची ती प्रतिमा मी कधीही विस्मृतीत जाऊ देणार नाही.