खलिस्तानी समर्थक अमृतपालसिंग याचे नाव सध्या देशभरात चर्चेत आहे. सध्या पंजाब पोलिस त्याच्या मागावर आहेत. पण तो फरार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी तो आहे असा दावाही केला जातो आहे. पण अजूनही तो पोलिसांच्या हाती सापडलेला नाही. न्यायालयानेही पोलिसांच्या या दिरंगाईबद्दल ताशेरे ओढलेले आहेत. पण हा अमृतपाल निर्ढावलेला खलिस्तानवादी कसा बनला? त्याच्याकडे ही सूत्रे कशी आली? त्याविषयी…
अमृतपाल सिंग हा अमृतसरजवळील जल्लूपूर खेडा गावचा रहिवासी आहे. तरुणांना संघटनेशी जोडण्यासाठी तो प्रक्षोभक भाषणे देतो, असे त्याच्याबद्दल बोलले जाते. अमृतपाल सिंग याने १० फेब्रुवारी २०२३ रोजी ब्रिटनस्थित एनआरआय मुलगी किरणदीप कौरशी मूळ गावी जल्लूपूर खेडा येथे एका साध्या सोहळ्यात विवाह केला. अमृतसरमधील बाबा बकालाच्या गुरुद्वारात आयोजित ‘आनंद कारज’मध्ये दोन्ही बाजूचे कुटुंबीय उपस्थित होते. किरणदीपचे कुटुंब मूळचे जालंधरच्या कुलरण गावचे आहे.
भिंद्रनवाल्याशी तुलना
२९ सप्टेंबर २०२२ रोजी ‘वारीस पंजाब दे’ संस्थेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त मोगा जिल्ह्यातील रोडे गावात एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संस्थेच्या प्रमुखपदी अमृतपाल याची नियुक्ती करण्यात आली. जरनैलसिंग भिंद्रनवाले याचे मूळ गाव असल्याने स्थळाची निवड अत्यंत मोक्याची होती. भिंद्रनवालेप्रमाणेच अमृतपालही निळ्या रंगाचा गोल फेटा घालतो. पांढऱ्या कपड्यात एक छोटा साबर (बाण) ठेवतो आणि भडकाऊ भाषणेही देतो, म्हणूनच हा कट्टरपंथी शीख तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे.
अमृतपालने पाच महिन्यांपूर्वीच ‘वारिस पंजाब दे’ची कमान आपल्या हाती घेतली होती. तेव्हापासून अमृतपाल चर्चेत आहे. सरकारला दिलेल्या इशार्यामुळे तो शीख तरुणांमध्येही खूप लोकप्रिय आहे. दुबईहून परतलेल्या अमृतपाल सिंगला ’वारिस पंजाब दे’चे प्रमुख बनवण्यात आले. हजारोंच्या जमावासमोर अमृतपाल वेगळ्या खलिस्तानच्या मागणीसाठी सध्या आवाज उठवत आहे.
अमृतपाल म्हणतो, “माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब शीख समुदायाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित आहे. जर्नेलसिंग भिंद्रनवाले हे माझे प्रेरणास्थान असून त्यांच्या स्वप्नांसाठी आम्ही बलिदानही देऊ. आम्ही अजूनही गुलाम आहोत आणि जोपर्यंत आम्ही खलिस्तान घेत नाही तोपर्यंत आम्हाला स्वातंत्र्य मिळणार नाही.”
हे ही वाचा:
शरद पवार म्हणतात, सावरकरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही!
पंतप्रधान मोदींचे चित्र फाडणाऱ्या गुजरातच्या आमदाराची लायकी न्यायालयाने दाखविली
मनसेचे ठाणे शहरप्रमुख अविनाश जाधव यांना मुंब्र्यात बंदी
सौदी अरबमध्ये हज यात्रेकरुंची बस आगीच्या भक्ष्यस्थानी,२० प्रवाशांचा मृत्यू
“वारिस पंजाब दे’” चा अर्थ काय आहे?
पंजाबी अभिनेता आणि कार्यकर्ते दीप सिद्धू यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये ‘वारीस पंजाब दे’ या संस्थेची स्थापना केली. त्याचा उद्देश सांगितला – तरुणांना शीख धर्माच्या मार्गावर आणणे आणि पंजाबला ‘जागे’ करणे. या संघटनेच्या एका उद्देशावरही वाद आहे. दीप सिद्धू २६ जानेवारी २०२१ रोजी लाल किल्ल्यावर खालसा पंथचा ध्वज फडकावल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला होता. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. दीप सिद्धू यांच्या निधनानंतर संस्थेच्या प्रमुखाचे पद रिक्त झाले होते. सप्टेंबर २०२२ मध्ये अमृतपाल सिंग ‘वारीस पंजाब दे’चे प्रमुख बनले. खलिस्तानी बंडखोर जनरल सिंग भिंद्रनवाले यांच्या रोडे गावात ही कमांड त्यांच्याकडे सोपवण्यात आली. अमृतपाल सिंग हा स्वतःला खलिस्तानी दहशतवादी जनरल सिंग भिंद्रनवालेचा अनुयायी असल्याचा दावा करतो. मात्र, अमृतपाल सिंग खलिस्तानच्या नावाखाली शीख तरुणांची दिशाभूल करत असल्याचे दीप सिद्धूच्या कुटुंबीयांचे मत आहे.
अमृतपालची मागणी मान्य तात्काळ मान्य करण्याची तत्परता सरकारने दाखविल्याने अशा संकटांसाठी सरकार फारच कच्चे आहे, असा समज वाढण्याची शक्यता आहे .काही जण हिंदूराष्ट्रासाठी घोषणा देऊ शकतात, साम्यवादी त्यांचे राज्य निर्माण करण्याची आकांक्षा बाळगू शकतात आणि ‘इन्कलाब’ (क्रांतीचा)चा नारा देऊ शकतात, तर खलिस्तानच्या शांततापूर्ण मागण्या गुन्हेगारी का ठरवल्या जातात? असे म्हणत अमृतपालने सरकारला वेठीस धरले.
सुदैवाने, या घटनेला पंजाबमधील सर्वसामान्य समाजाचा अजूनही पाठिंबा नाही. अमृतपालसिंगने अशाप्रकारे गुरुग्रंथसाहिबचा केलेला गैर-वापर त्यांनाही आवडलेला नाही. मात्र, अमृतपालसिंग हा केंद्र सरकारचा हस्तक आहे अथवा सध्याच्या पंजाब सरकारचा हस्तक आहे, असा प्रचार केल्याने अमृतपालसिंग नावाचा नवीन भिंद्रनवाले तयार होऊ शकतो, याची जाणीव सर्वांनीच ठेवली पाहिजे.
आज खलिस्तानची चळवळ केवळ कागदावर शिल्लक आहे, तिला संजीवनी मिळणे विश्वगुरू पदाकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या भारत राष्ट्रासाठी हितावह नाही. भारतासारख्या आंतरराष्ट्रीय शक्तीची कोंडी करण्यासाठी या शेतकरी आंदोलनाच्या आडून खलिस्तानची चळवळ पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत असल्याने सर्व राजकीय पक्षांनी आपण कुठलीही वादग्रस्त विधाने अथवा कृती करू नये.