रविवारी राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्याचे लाइव्ह टेलिकास्ट सुरू असताना काही प्रेक्षकांनी शपथविधी सोहळ्यात बिबळ्या दिसल्याचा दावा केला होता. मात्र तो प्राणी बिबळ्या नसून पाळीव मांजर होते, असे स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिले आहे.
नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा रविवारी राष्ट्रपती भवनात पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत ७१ मंत्र्यांनीही शपथ घेतली. या सोहळ्यातील एक व्हिडीओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. यात राष्ट्रपती भवनाच्या आवारात एक प्राणी फिरत असल्याचे दिसत आहे. काही सोशल मीडिया यूजरने व्हिडीओमध्ये दिसत असलेला प्राणी बिबळ्या असल्याचे सांगत सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी झाल्याचा आरोप केला आहे.
हे ही वाचा:
अनिल असल्याचे भासवत खलीलचा हिंदू महिलेवर बलात्कार; पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ५०० वर्षे जुनी ब्राँझची मूर्ती भारताला परत करणार!
बिहारमधील अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल
इस्रायल-हमास दरम्यान युद्धविरामाचा प्रस्ताव सुरक्षा परिषदेत संमत!
भाजपचे खासदार दुर्गा दास हे व्यासपीठावर कायदेशीर सोपस्कार पूर्ण करत असताना हा प्राणी फिरत असल्याचे दिसते आहे. मात्र याबाबत दिल्ली पोलिसांनी काही तासांनंतर स्पष्टीकरण दिले आहे. ‘यातील काहीही खरे नाही. कॅमेऱ्यात दिसलेला प्राणी पाळीव मांजर आहे. कृपा करून अशा अफवांवर विश्वास ठेवू नका,’ असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्यामुळे व्हिडीओत दिसलेला प्राणी बिबळ्या नव्हे तर पाळीव मांजर असल्याचे स्पष्ट झाले असून शपथविधी सोहळ्यादरम्यान सुरक्षाव्यवस्थेत कोणतीही त्रुटी नव्हती, हेदेखील सिद्ध झाले आहे.