‘काश्मीर फाइल्स’ पाहणाऱ्या १९०० ग्राहकांना मिळाली जेवणाची ट्रीट

‘काश्मीर फाइल्स’ पाहणाऱ्या १९०० ग्राहकांना मिळाली जेवणाची ट्रीट

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट संपूर्ण देशभरात चांगलाच गाजतो आहे. त्यात मांडलेला काश्मिरी पंडितांचा विषय प्रत्येकाच्या मनाला भिडला आहे. पुण्याच्या पाषाण येथील हॉटेल खानदेशने तर काश्मीर फाइल्स हा चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाला हॉटेलातील जेवणावर २० टक्के सूट जाहीर केली आहे.

या हॉटेल खानदेशचे मालक नाना गरुड यांनी अशी जाहिरात केली असून ती जाहिरात सध्या चांगलीच गाजते आहे. ही जाहिरात वाचून लोक हॉटेलला भेट देत आहेत तसेच काश्मीर फाइल्स पाहणारे चित्रपटरसिक हॉटेलने दिलेल्या या सवलतीचा लाभही घेत आहेत.

नाना गरुड यांना यासंदर्भात विचारल्यावर ते म्हणतात की, या योजनेला खूप प्रतिसाद मिळतो आहे. तब्बल १९०० लोक गेल्या दोन दिवसांत जेवून गेले आहेत. काश्मीर फाइल्स चित्रपट पाहणारे लोक तिकीट दाखवून या योजनेचा लाभ घेत आहेत. देशप्रेमी नागरिकांसाठी आम्ही ही योजना आखली. व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाबाबत ही सूट देण्यात आली आहे.

गरुड म्हणाले की, माझे जळगावला आधी हॉटेल होते. गेली ४० वर्षे मी या व्यवसायात आहे. तिथे काश्मीरमधून आलेले दोन तरुण काम करत होते. त्यांच्याकडे पाहून मला त्यांची दया आली आणि मी त्यांना नोकरी दिली. काही महिने काम करून मग त्यांनी नोकरी सोडली. त्यामुळे काश्मीर फाइल्स हा चित्रपट आल्यावर मला हा विषय भिडला.

हे ही वाचा:

मुंबई पोलिसांनी पारदर्शक भूमिका घेतली असती तर…

आसाम मधील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार काश्मीर फाईल्स पाहण्यासाठी अर्ध्या दिवसांची सुट्टी

होळीच्या निमित्ताने ठाकरे सरकारची नवी नियमावली

नवाब मलिकांना दणका; ईडी फराझ मलिकला तिसरं समन्स पाठवणार

 

मी ही जाहिरात सोशल मीडियावर टाकल्यानंतर ती चांगलीच व्हायरल झाली. अगदी मला परदेशातूनही फोन आले. ऑस्ट्रेलिया, अमेरिकेतूनही फोन केले गेले. माझ्याकडे बिर्याणीचा दर १०० रुपये आहे. त्यातही मी २० टक्के सूट देतो आहे. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर मी हे करतो आहे. माझ्या हॉटेलपासून जवळ काही थिएटर आहेत. शो सुटल्यावर हॉटेलवर येतात आणि या सवलतीचा लाभ घेतात. लोकांचा खूप प्रतिसाद मिळतो आहे, असे गरुड सांगतात.

Exit mobile version