संपूर्ण देशातच सध्या कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. महाराष्ट्राच्या शेजारील राज्य गुजरातमध्ये देखील कोरोना फोफावत आहे. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच गुजरातच्या सारंगपूर येथील हनुमान मंदिराच्या धर्मशाळेचे रुपांतर एका रुग्णालयात करण्यात आले आहे.
सध्याच्या काळात रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापनाने संपूर्ण तयारी केली आहे. यामध्ये बाह्यरुग्ण उपचार केंद्र (ओपीडी), डॉक्टरांचे केबिन, पंचेचाळीस विलगीकरण कक्ष, पाच व्हेंटिलेटर, आयसीयु कक्ष इत्यादी अशा तऱ्हेच्या सर्व सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या सेवेसाठी ५० लोकांचा कर्मचारी वर्ग देखील व्यवस्थापनाकडून तैनात करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
दादरचे भाजी मार्केट बंद होणार?
यवतमाळमध्ये बेड न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू
मुंबई पाठोपाठ दिल्लीतूनही मजूरांचे स्थलांतर
मंदिर व्यवस्थापनाने रुग्णालय स्थापन करताना संपूर्ण काळजी घेतलेली दिसून आली आहे. यात अजून पर्यंत कोविड रुग्णांना दाखल करून घेतलेले नाही, परंतु त्यासाठी मंदिर व्यवस्थापन तयार असल्याचे पहायला मिळाले आहे. कोविडशी सामना करण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केलेली आढळून आली आहे.
देशात सध्या कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. शाळांच्या परिक्षा रद्द अथवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, काही राज्यात अंशतः किंवा पूर्णतः टाळेबंदी करण्यात आली आहे. दिल्लीत कालपासून पूर्ण टाळेबंदी करण्यात आली आहे. त्याबरोबरच देशात लसीकरणाचा परिघ वाढवायला सुरूवात केली आहे. आत लस १८ वर्षांवरील सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. त्याबरोबरच भारत सरकारने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन सोबत स्पुतनिक-५ या रशियाच्या लसीला परवानगी दिली आहेच, शिवाय त्यासोबत चार अजून लसींचा मार्ग मोकळा केला आहे.