केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. शनिवारी( १२ एप्रिल) ते रायगडच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांच्या घरी भोजनासाठी जाणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम शनिवारी रायगडवर पार पडणार आहे. यासाठी गृहमंत्री अमित शाह रायगडमध्ये दाखल होणार आहेत. पुणे विमानतळावर सकाळी १० वाजता त्यांचे आगमन होईल. त्यानंतर ते पाचाडमध्ये येतील आणि थेट शिवरायांच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतील.
रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर गृहमंत्री अमित शाह हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांच्या घरी (सुतारवाडी) भोजनासाठी जाणार आहेत. सुनील तटकरे यांनी गृहमंत्री शाह यांना अगोदरच जेवणाचे निमंत्रण दिले होते आणि गृहमंत्र्यांनी ते स्वीकारले.
यासह रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून रायगडच्या पालकमंत्री पदासाठी दावा केला जात आहे. त्यामुळे हा तिढा गृहमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान सुटतोय का हे बघावे लागणार आहे. कारण शनिवारच्या रायगड दौऱ्यांनंतर गृहमंत्री मुंबईमध्ये असतील आणि या दौऱ्यादरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या भेटीमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गृहमंत्री शाह रायगड दौऱ्यानंतर मुंबईला रवाना होणार आहेत.
हे ही वाचा :
चारधाम यात्रा ३० एप्रिलपासून सुरू होणार
“रात्रभर झोपच लागली नाही…” काय घडलं रजत चौहानसोबत?
विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी ९५४ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च
“रन जड झाले, स्वप्नं मोडली – दिल्ली मात्र ठाम उभी राहिली!”
‘असा’ असेल गृहमंत्र्यांचा दौरा
- पुणे विमानतळ – दि. १२ रोजी सकाळी १० वाजता आगमन
- पाचाडमध्ये लँडींग – सकाळी १०.४५ वाजता
- रायगड किल्ल्यावरील मुख्य कार्यक्रम – सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत
- पाचाडवरुन टेक ऑफ – दुपारी १.३० वाजता
- सुतारवाडी (सुनिल तटकरे निवासस्थान) – दुपारी २ वाजता – भोजनासाठी थांबणार असल्याची माहिती
- मुंबईकडे रवाना – दुपारी ३ वाजता
- विलेपार्ले कार्यक्रम – दुपारी ४ ते ६ (चित्रलेखा साप्ताहिकाचा कार्यक्रम – मुकेश पटेल सभागृह)
- रात्री सह्याद्री अतिथीगृहावर मुक्काम
- दुसऱ्या दिवशी (दि. १३ ) सकाळी १० वाजता दिल्लीकडे रवाना