छत्तीसगड या राज्यात लवकरच नवी ऐतिहासिक कामगिरी केली होणार आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त गावांमध्ये मतदान पार पडणार आहे. जवळपास १२० हून अधिक नक्षलग्रस्त गावे ही त्यांच्या स्वतःच्याच गावात मतदान करणार आहेत. निवडणूक आयोगाच्या वतीने या गावांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून मतदानाची तयारी करण्यात येत आहे.
छत्तीसगडमधील ही काही गावे नक्षलग्रस्त म्हणून ओळखली जातात. मतदानासाठी या गावातील गावकरी दुसऱ्या गावात जात असत. मात्र, आता नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावांत यंदा प्रथमच मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सुरक्षा दलांनी अथक परिश्रम घेऊन बस्तर भागातील परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणल्याचे आणि येथे लोकशाही अधिक मजबूत केल्याचे हे परिणाम असल्याचे मानले जात आहे.
बस्तर विभागामध्ये सात जिल्हे आहेत. यामध्ये विधानसभेचे १२ मतदार संघ आहेत. ७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानात येथील १२६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
गेल्या ६५ वर्षापेक्षा अधिक काळ छत्तीसगडमधील बस्तर विभागातील अनेक गावे नक्षलग्रस्त आहेत. त्यामुळे या गावातील नागरिकांना मतदानासाठी आठ- दहा किलोमीटरचे अंतर पायी जावे लागत होते. पुरेशा सुविधा नसल्यामुळे त्यांना डोंगर दऱ्या, नद्या ओलांडत अन्य गावांमध्ये मतदानासाठी जावे लागत होते. त्यामुळे मतदानाची टक्केवारीही कमी नोंदवली जात होती.
यापूर्वी या भागाची दुर्गमता आणि नक्षलवाद्यांकडून देण्यात येणाऱ्या धमक्यांमुळे बस्तर विभागातील अनेक गावांत मतदान केंद्रे सुरू करता येत नव्हती, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, मागील पाच वर्षांपासून येथील नक्षलग्रस्त भागात केंद्र आणि राज्यातील सुरक्षा दलाच्या छावण्या स्थापन करण्यात आल्याने येथील नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
मणिपूर विद्यार्थी हत्याकांड प्रकरणातील मास्टरमाइंडला पुण्यातून अटक
इस्रायलकडून गाझामध्ये छापे; ‘ही तर केवळ सुरुवात’ नेतान्याहू यांचा इशारा
गाझात आकाशातून पत्रके पडली, ११ लाख पॅलेस्टिनींना विस्थापित होण्याच्या सूचना
डोंबिवलीतील शाळेच्या शिक्षिकेकडून ५० ते ६० विद्यार्थ्यांना बेदम मारहाण!
“एकेकाळी नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बस्तर विभागातील १२६ ठिकाणी यंदा पहिल्यांदाच मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. ही नवी मतदान केंद्रे येणाऱ्या पिढ्यांना ‘बुलेट’वर ‘बॅलेट’ने कशापद्धतीने यश मिळवले याची यशोगाथा सांगतील,” अशा शब्दात बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.