अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात शुक्रवारी खेळल्या जाणाऱ्या टी २० विश्वचषक सामन्यावर पावसाने पाणी फेरले. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण बहाल करण्यात आला. त्यामुळे अमेरिकेने पाच गुणांसह सुपर आठमध्ये धडक दिली आहे. तर, पाकिस्तानचे पुढच्या फेरीत पोहोचण्याचे स्वप्न धुळीला मिळाले आहे.
पहिल्यांदा टी २० विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी उतरलेल्या अमेरिका संघाने इतिहास रचला आहे. फ्लोरिडातील लॉडरहिल येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यात नाणेफेकही झाली नाही. अमेरिका चार सामन्यांत पाच गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला. आयर्लंडने दोन सामने खेळले आणि दोन्ही सामन्यांत त्याचा पराभव झाला. या गुणतक्त्यात आयर्लंड तळाला आहे. तर, पाकिस्तानने तीन सामन्यांत केवळ एकच विजय मिळवला असून तो तिसऱ्या स्थानी आहे. तर, भारताने सलग तीन सामने जिंकून सहा गुण मिळवून गुणतक्त्यात शीर्ष स्थान मिळवले आहे.
अमेरिकेने पहिल्या सामन्यात कॅनडाला पराभूत केले होते. तर, दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव करून सर्वांनाच धक्का दिला होता. तर, तिसऱ्या सामन्यात त्यांना भारताने पराभूत केले. पाकिस्तानने त्यांचा शेवटचा आयर्लंडविरुद्धचा सामना जिंकला तरीही त्यांचे गुण चारच होऊ शकतात.
सुपर आठमध्ये पोहोचणारा अमेरिका हा सहावा संघ
अमेरिका टी २० विश्वचषक स्पर्धेत सुपर आठमध्ये पोहोचणारा अमेरिका हा सहावा संघ ठरला आहे. याआधी भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजने सुपर आठमध्ये धडक दिली आहे. या विश्वचषक स्पर्धेत २० संघांनी सहभाग घेतला. पाच-पाच संघांची चार गटांत विभागणी केली गेली. चारही गटांमधील दोन संघांना सुपर आठचे तिकीट मिळाले आहे.
हे ही वाचा..
सराफा व्यापाऱ्याकडून शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या विरोधात फसवणूकीची तक्रार
अंतरवालीत जरांगेंनंतर ओबीसी आक्रमक, उपोषण सुरु!
“ठाकरेंनी चार महिने ज्यांचे पाय पकडले त्यांच्यामुळेच माविआला मतदान”
उजैनमध्ये सट्टेबाजांवर पोलिसांचा छापा, १४.५८ कोटी रुपये जप्त!
अमेरिकेच्या संघात भारतीय वंशाचे आठ खेळाडू
अमेरिकेच्या संघात भारतीय वंशाचे आठ खेळाडू आहेत. यामध्ये कर्णधार मोनांक पटेल, हरमीत सिंग, जसप्रीत सिंग, नोसथुष केंजिगे, नितीश कुमार, मिलिंद कुमार, सौरभ नेत्रवलकर आणि निसर्ग पटेल यांचा समावेश आहे. नेत्रवलकरने तर भारताविरोधात विराट कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजाला बाद केले होते. त्याने भारतासाठी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले होते.