वक्फ (दुरुस्ती) कायद्याच्या निषेधादरम्यान पश्चिम बंगालमधील मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंसाचार उसळला होता. दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या असून यात हिंदूंना लक्ष्य करण्यात आले होते. मुस्लिम जमावाकडून होत असलेल्या हिंसाचारापासून वाचण्यासाठी म्हणून हिंदू समाजाने या भागातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले. शेकडो हिंदू लोक गंगा नदी ओलांडून बोटीने मालदा जिल्ह्यातील लालपूर शहरात जातानाचे अनेक व्हिडीओ समोर आले होते.
अनेक हिंदू लोकांनी त्यांचे घर सोडून शेजारच्या मालदा जिल्ह्यात आश्रय घेतला. हिंसाचार आणि भीतीमुळे लोकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली होती, परंतु आता मुर्शिदाबाद जिल्ह्यातील परिस्थिती सुधारत असल्याने हिंदू लोक आपल्या घरी परतत असल्याची माहिती आहे. याबाबत, कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष ठेवणारे पश्चिम बंगाल अतिरिक्त महासंचालक (एडीजी) जावेद शमीम म्हणाले की, लोकांना पोलिसांच्या संरक्षणाखाली परतण्यास मदत केली जात आहे.
एडीजी जावेद शमीम म्हणाले की, “मुर्शिदाबादमधील अनेक गावांमध्ये लोक आधीच परतले असून आणखी लोक राज्य पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली आणि संरक्षणाखाली परतत आहेत. पश्चिम बंगाल पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी मुर्शिदाबादमध्ये उपस्थित आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.” शनिवारपासून मुर्शिदाबादमध्ये हिंसाचाराची कोणतीही नवी घटना घडलेली नाही, असे एडीजी यांनी सांगितले. ते म्हणाले की, आशा आहे की परिस्थिती लवकरच सामान्य होईल. अशांततेदरम्यान घरे सोडण्यास भाग पाडलेल्या सर्व लोकांना परत आणण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करत आहोत.
गेल्या ३६ तासांत मुर्शिदाबाद येथे परिस्थिती शांत असली तरी, अफवा पसरवल्या जात असून त्यामुळे शांतता प्रस्थापित करण्यात अडथळा येत असल्याचे एडीजी म्हणाले. सध्या आमच्यासाठी अफवा पसरवणारे सर्वात मोठे आव्हान आहेत, असे बंगाल पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले. मुर्शिदाबादमध्ये सध्या पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. गेल्या ३६ तासांत हिंसाचाराची कोणतीही घटना घडलेली नाही. हिंसाचाराला जबाबदार असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिलेले आहे.
हे ही वाचा :
गरिबांना लुटणाऱ्यांना पंतप्रधान मोदी सोडणार नाहीत
तृणमूल काँग्रेस म्हणते, सीमासुरक्षा दलाच्या मदतीने मुर्शिदाबादेत दंगल!
झारखंड: महायज्ञानंतर मिरवणुकीवर दगडफेक!
सलमान खानला पुन्हा धमकी, घरात घुसून ठार मारू!
तसेच शांतता राखण्यासाठी काही भागात इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. लोकांना अफवांपासून दूर राहण्याचे आणि चुकीची माहिती शेअर न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य दोन्ही दल शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. संपूर्ण मुर्शिदाबाद आणि जंगीपूरमध्येही लवकरच परिस्थिती सामान्य होईल अशी अपेक्षा आहे. शांतता आणि सुसंवाद राखण्यासाठी संवेदनशील भागात रूट मार्च आणि पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.