नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्र या ठिकाणी विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आले आहे.आजपासून तीन दिवस हे संमेलन असणार आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या सोहळ्याला उपस्थिती लावली.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात राज्यातील मराठी भाषेच्या परिस्थितीवर आपली भूमिका मांडली.आपलं राज्य आणि भाषेवरचे प्रेम लपवू नका.समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी मराठीतच बोलण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी उपस्थितांना केले.यासह महाराष्ट्र सरकारने राज्यातल्या सर्व शाळांमध्ये पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करावी, अशी विनंती राज ठाकरे यांनी यावेळी केली.
राज ठाकरे म्हणाले की, गेली अनेक वर्ष मराठी विषयावर बोलतोय, अंगावर केस घेतल्या आहेत, मराठी विषयासाठीच मी जेलमध्ये गेलो. मी आताही तेच सांगत होतो की, मी अत्यंत कडवट मराठी आहे. माझ्यावर संस्कारही त्याचप्रकारचे झाले आहेत. आजोबांचे पुस्तकरुपात झाले. बाळासाहेंबांचे, माझ्या वडिलांचे झाले आणि महाराष्ट्रातील अनेक लोकांचे झाले आणि महाराष्ट्र ही काय ताकद आहे, हे जसंजसं समजत गेलं, तसातसा मी आणखी त्याच्या प्रेमात पडत गेलो. जूनमध्ये मला अमेरिकेतील मराठी मंडळानं आमंत्रण दिलं. याचे अध्यक्ष मला भेटले त्यांनी मला सांगितलं की, आम्ही अमेरिकेत १०० मराठी शाळा काढल्या आहेत. महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद होत असताना, अमेरिकेत मराठी शाळा सुरु होतात, हे काही कमी आहे का?.
हे ही वाचा:
‘त्या’ वाजुखाना परिसरात शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी द्यावी
रोहन बोपण्णाने ग्रँडस्लॅमसह अनोख्या विक्रमाला घातली गवसणी
‘आयपीएस अधिकाऱ्या’ने केलेल्या कृतीमुळे त्याचे बिंग फुटले
हुती दहशतवाद्यांकडून मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्रहल्ला!
ते पुढे म्हणाले की, आपण आधी महाराष्ट्रात लक्ष देणं गरजेचं आहे. जगभरात मराठी माणूस गेला आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच आहे. पण महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये मराठी सोडून जेव्हा हिंदी माझ्या कानावर येते, तेव्हा त्रास व्हायला लागतो. भाषेला विरोध नाही. पण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. जशा इतर भाषा आहेत, तशीच हिंदी एक भाषा आहे. देशात राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.जशी मराठी, तमिळ, तेलगु, गुजराती भाषा आहेत, तशीच हिंदीसुद्धा भाषा आहे. या देशात राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही, राष्ट्रभाषा म्हणून कोणतीही भाषा नेमली गेलीच नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयासाठी हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषा ठेवल्या. पण हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले की, आमच्यावर हिंदी चित्रपटांचे संस्कार झाले.बोलताना आपण मराठी लोक हिंदीचा वापर का करतो?. इतकी समृद्ध आपली भाषा आहे. मराठी भाषेत जो विनोद होतो, तो दुसऱ्या कुठल्या भाषेत होत असेल असं मला वाटत नाही. पण आज ही भाषा बाजूला सारण्याचा राजकीय प्रयत्न होतोय. ते पाहून माझी तळपायाची आग मस्तकात जाते.यावेळी व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर देखील उपस्थित होते.महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करण्याची मागणी राज ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली.