भारतातील प्रत्येक पात्र नागरिकाला लस मिळायला हवी यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. दुर्गम भागातील नागरिकांनाही लस मिळावी यासाठी केंद्र सरकाच्या मोहिमेचा एक भाग म्हणून ईशान्येकडील अति दुर्गम अशा भागात सोमवारी (४ ऑक्टोबर) ड्रोनद्वारे लस पोहचवण्यात आली. ड्रोनच्या माध्यमातून औषधे पोहचवण्याचा हा दक्षिण आशियातील पहिलाच प्रयोग होता. हे व्यावसायिक उड्डाण यशस्वी झाल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे.
मणिपूरमधील कारांगच्या बिश्नुपुर जिल्हा रुग्णालय ते लोकतक तलाव असे १५ किलोमीटर हवाई अंतर १२ ते १५ मिनिटांमध्ये ड्रोनच्या सहाय्याने पार करण्यात आले. रस्त्यामार्गे हे अंतर २६ किलोमीटर आहे. सोमवारी लस पुरवल्यानंतर १० लाभार्थ्यांनी पहिला, तर आठ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला. यासाठी मेक इन इंडिया म्हणजेच भारतात निर्मित केलेल्या ड्रोनचा वापर करण्यात आला.
हे ही वाचा:
…म्हणून व्हाॅट्सॲप, फेसबुक झाले होते बंद
आर्यन खानचे व्हॉट्सअप चॅट आले समोर
गीतकार जावेद अख्तरविरुद्ध गुन्हा दाखल
‘हा’ अवलिया बेटावर तब्बल ३२ वर्षे एकटाच राहत होता… वाचा सविस्तर
केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) या ड्रोन रिस्पॉन्स अँड आऊटरिच (आय- ड्रोन) सेवेचा प्रारंभ केला. जीवरक्षक लस सर्वांपर्यंत पोहचल्याची खात्री या मॉडेलद्वारे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जीवरक्षक औषधे पोहचवण्यासाठी, रक्त नमुने संकलित करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो. आपत्कालीन परिस्थितीत या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहचविण्याचे आव्हान पेलण्यात हे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला आहे. सध्या मणिपूर, नागालँड आणि अंदमान- निकोबारसाठी या ड्रोन आधारित प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे.