सरकारी जिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असणाऱ्या अनुसूचित जमातीमधील डॉक्टरला आदिवासी समाजाचे प्राबल्य असलेल्या डुंगारपूर या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची परवानगी मिळाली आहे. हा डॉक्टर भारतीय ट्रायबल पार्टी या पक्षातर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. तसेच, हा डॉक्टर या निवडणुकीत पराभूत झाल्यास त्याला पुन्हा कामावर रुजू होण्याची परवानगीही उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठाने दिली आहे.
डुंगरपूरच्या सरकारी रुग्णालयात तीन स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्यापैकी एक आहेत डॉ. दीपक घोगरा. ते या रुग्णालयात गेल्या १० वर्षांपासून सेवा देत आहेत. त्यांनी निवडणुकीसाठी नामांकन पत्र जाहीर करण्यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपल्याला आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहायचे असून त्यासाठी आपल्याला वैद्यकीय अधिकारीपदाच्या सेवेतून मुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली होती.डुंगरपूर जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असलेले डॉ. घोगरा म्हणाले, “उच्च न्यायालयाने असा आदेश दिला आहे की, मी निवडणुकीत पराभूत झालो तरी मला वैद्यकीय अधिकारी पदावर पुन्हा रुजू होण्याची परवानगी दिली जाईल.’
हे ही वाचा:
आरक्षणाला विरोध करणाऱ्या तरुणाला मराठा आंदोलकांकडून चोप
झोपण्याची दोन इंच जागा कमी झाल्याने कैद्यांची न्यायालयात धाव
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ११ निर्णयांना मान्यता!
संगमनेर कारागृहातून चार कैद्यांचे पलायन!
गळ्यात स्टेथोस्कोप घालून त्यांनी आपल्या भागात प्रचार सुरू केला आहे. “आदिवासी भागात चोरासी आणि सागवाडा येथे आमचे दोन आमदार आहेत. येथे भारतीय ट्रायबल पार्टी लोकप्रिय असल्याने मी या पक्षाकडे तिकीट मागितले. एक डॉक्टर असल्याने, मला राजकारणात यायचे होते कारण हे असे क्षेत्र आहे जिथे आपल्याला सुशिक्षित लोकांची गरज आहे,’ असे ते सांगतात. ४३ वर्षीय घोगरा यांनी उदयपूरच्या आरएनटी मेडिकल कॉलेजमधून स्त्रीरोगशास्त्रात एमबीबीएस आणि पीजी पदवी प्राप्त केली आहे. सन २०१४मध्ये जिल्हा रुग्णालयात रुजू झाल्यापासून त्यांनी २० हजार प्रसूती केल्या आहेत, असा दावा त्यांनी केला.
डुंगरपूरचे लोक त्यांना ‘बॉक्स मॅन’ म्हणून ओळखतात. “मी ग्रामीण भागातील सरकारी शाळांमधील मुलांना पेन्सिल, खोडरबर आणि शार्पनरसह २० हजारांहून अधिक बॉक्स वितरित केले आहेत, म्हणूनच ते मला बॉक्स-मॅन म्हणतात,” डॉ घोगरा म्हणाले. घोगरा हे डुंगरपूर जिल्ह्यातील पाल देवल घोगरा फाला येथील रहिवासी आहेत. “या आदिवासी भागातील लोकांनी शिक्षित, निरोगी जीवन आणि रोजगाराच्या भरपूर संधी मिळाव्यात, अशी माझी इच्छा आहे. जंगल वाचवण्याचा माझा अजेंडा आहे कारण जंगल आणि निसर्ग नसल्यामुळे आदिवासींचे अस्तित्वच धोक्यात आले आहे,’ असे डॉ. घोगरा सांगतात.